(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tata Air Bus Project: राज्यातील उद्योग बाहेर पळवण्यासाठीच सत्तांतर; सुभाष देसाई यांचा गंभीर आरोप
Tata Air Bus Project: राज्यातील उद्योग पळवण्यासाठीच सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
Subhash Desai On Tata Air Bus Project: टाटा एअर बसचा प्रकल्प (Tata Air Bus Project) राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला. सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेले आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ब्र देखील का काढत नाही असा सवालही देसाई यांनी केला. भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका देसाई यांनी केली. 'एबीपी माझा'सोबत संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.
टाटा-एअर बसचा प्रकल्प हा 22 हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.
मविआ काळात प्रकल्पासाठी प्रयत्न
बेंगळुरूमध्ये हवाई उद्योगांशी संबंधित एक मोठे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या ठिकाणी टाटा आणि एअरबसच्या अधिकाऱ्यांसोबत प्रकल्पाबाबत चर्चा झाली. मनुष्यबळ, सवलती देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पुढे 'वर्षा' बंगल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासोबत एक बैठक झाली. यामध्ये सेमीकंडक्टर, एअरबस आणि इतर प्रकल्पांबाबतही चर्चा झाली होती. त्याच्या पुढील टप्प्यात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत मी स्वत: मंत्री आदित्य ठाकरे, टाटा समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांच्यासह संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रकल्पांच्या अनुषंगाने चर्चा होती असेही देसाई यांनी सांगितले.
हा कसला योगायोग?
हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर झाल्यात. पण गुजरातच्या निवडणूका जाहीर झाल्या नाहीत. दरवेळेस हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकत्रित जाहीर होतात. यंदा मात्र, योग्य वेळी घोषणा होईल असे निवडणूक आयुक्तांनी म्हणत पत्रकार परिषद आटोपती घेतली. गुजरातमध्ये सध्या विविध प्रकल्पांची घोषणा, भूमिपूजन आदी कार्यक्रम सुरू आहेत. भाजप सरकारला वेळ मिळावा यासाठीच गुजरातची निवडणूक जाहीर झाली नाही का, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.
टाटा-एअर बसचा प्रकल्प गुजरातमध्ये
नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.