लोकांना कृषी मंत्री माहित नाही, तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाही; आदित्य ठाकरेंचा घणाघात
Aaditya Thackeray : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिन्नर तालुक्यातील सोनोरी या नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा केला.
नाशिक : ओला दुष्काळ जाहीर करावा हीच आमची मागणी असून बांधावर गेल्यावर शेतकऱ्यांचे (Farmer) दुःख कळत आहे. लोकांना जसं कृषी मंत्री माहित नाहीत तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाहीत, ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) टोला लगावलाय.
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सिन्नर तालुक्यातील सोनोरी या नुकसानग्रस्त भागांत पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी बांधवांना मदत करणे गरजेचे आहे. पर्यावरण मंत्री होतो त्यामुळे मला माहित आहे की वातावरण बदलामुळे अतिवृष्टी आणि अशी संकटे उभी राहत आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बांधावर आल्यावर कळतं शेतकऱ्यांचं दुःख काय आहे. त्यामुळे खदखद बाहेर येते आहे. कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. लोकांना जसं कृषी मंत्री माहित नाही तसं आम्हाला मुख्यमंत्री माहित नाहीत. ते आम्हाला दिसत नसल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
रस्त्यावर उतरण्याची गरज का आली हे त्यांना कळले पाहिजे. लोकांचे आवाज ऐकणे गरजेचे आहे. आपत्ती येत असते, संकटं येत असतात, त्याला तोंड देणं महत्वाचं आहे. मात्र हे सरकार काम करत नाही असं निदर्शनात येत आहे. मजा मस्तीमध्ये सगळे चालले असून यात शेतकरी भरडला जात आहे. परिणामी शेतकरी बांधवांचा धीर सुटत चालला असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकरी बांधव संकटात असल्यावर कायम उभा असतो, आपल्याला देखील त्यांच्यासाठी उभे राहावे लागेल, असे आवाहन त्यांनी यावेळी आदितत्य ठाकरे यांनी केले. पुढील काळात खाते वाटप होणार, बंगले वाटप होणार, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार आहे का? असा खरमरीत सवाल त्यांनी यावेळी केला.
"शिधा वाटपात सगळ्या वस्तू मिळाल्या का ते बघावे लागणार असून टेंडर रेट कितीने दिला याची माहिती घ्यावी. सगळ्या वस्तू मिळाल्या का नाही मिळाल्या हे तपासावे. हे सरकार घटणात्मक नाही, काहीही झालं तरी आम्ही शेतकऱ्यांसोबत असून लाठीचार्जला आम्ही घाबरत नाही. नोटा लोकांच्या हातात पोहचणे महत्वाचे असून 50 खोके गद्दारांच्या घरी पोहचले, मात्र मदतीला पोहोचले नाही. शिवाय सध्या सामान्यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.
सरकार राजकारणात व्यस्त
हे सरकार फक्त राजकारणात व्यस्त असून अन्नदात्याची किंमत त्यांना कळायला पाहिजे. प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे, पण अजून पैसे आलेले नाहीत. पंचनामे अजून झालेले नाहीत. जिथे झाले आहेत तिथे मदत करावी. त्यासाठी राज्यभर दौरे करत असून महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. जिथे शेतकऱ्यांना गरज आहे तेथे उभे राहणार असून उद्धव ठाकरे आणि मी फिरत आहोत. बांधावर कोण गेलं आणि आमच्या गटात कोण आलं हेच ते दाखवतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगवला आहे.