Shirdi : पंजाबमधील 'मोस्ट वॉन्टेड'चा शिर्डीत मुक्काम; शिर्डी सुरक्षित आहे का? ABP Majhaच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक माहिती समोर
शिर्डीत सुद्धा पंजाबमधील मोस्ट वॉन्टेड (Punjab) आरोपीला थेट दशहतविरोधी पथकाने (ATS) लॉजवरून अटक केली आहे. त्यामुळं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली शिर्डी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Shirdi News: गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील घडणाऱ्या घटनांमुळे हाय अलर्ट (High Alert) लावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच शिर्डीत सुद्धा पंजाबमधील मोस्ट वॉन्टेड (Punjab) आरोपीला थेट दशहतविरोधी पथकाने (ATS) लॉजवरून अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली शिर्डी सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत दररोज हजारो साईभक्त हजेरी लावतात. दोन दिवसांपूर्वी पंजाब राज्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपीने शिर्डीत आश्रय घेतल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून खरच शिर्डीत साईभक्तांच्या नावाखाली गुन्हेगार हजेरी लावत असतील तर शिर्डीच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
एबीपी माझानं केलं स्टींग ऑपरेशन
शिर्डी शहरात प्रवेश करताच एन्ट्री पॉइंटवर बॅरिकेट पाहिल्यानंतर कोणाला ही वाटेल या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल मात्र हे बॅरिकेटिंग केलं गेलंय ते फक्त जड वाहतूक वळविण्यासाठी. एबीपी माझानं या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी 2 वाहतूक पोलीस वगळता एकही पोलीस दिसत नव्हता यावरूनच शिर्डीच्या एन्ट्री पॉइंटवर कोणतीच सुरक्षा नाही. या ठिकाणाहून पुढे शिर्डी मंदिराजवळ रोडवरच अनेक एजंट साईभक्तांच्या गाड्या भोवती घुटमळताना दिसून येतात. आलेल्या साईभक्तांना रूम, दर्शन कसे लवकर मिळेल यासाठी ही धावपळ दिसून येते. आम्ही ही मग पाठीवर सॅग घेत पायी चालत मंदिराकडे निघालो आणि रस्त्यात एका दलालाने आम्हाला गाठले आणि सुरू झाला रूम मिळविण्यासाठी प्रवास. या दलाला सोबत केलेल्या गप्पा आम्ही स्टिंग करत कॅमेरात कैद केल्या आणि केवळ मोबाईल नंबर असेल तरी कोणत्याही ओळखपत्र शिवाय रूम सहजरित्या मिळू शकते हे सत्य बाहेर आलं. यात केवळ मोबाईल नंबरवर रूम मिळत असली तरी नातेवाईक किंवा मित्राचा मोबाईल नंबर दिल्याशिवाय रूम देत नाही एवढंच दिलासादायक वास्तव समोर आलं असलं तरी कुणीही कुणाचाही नंबर देऊन रूम घेतली हे स्पष्ट होतंय हे देखील अवघडच आहे.
गर्दीच्या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
यानंतर आम्ही मंदिरात दर्शन रांगेकडे गेलो तिथे मात्र दर्शन रांगेपासून ते दर्शन करून बाहेर येईपर्यंत चोख बंदोबस्त दिसून आला. साई संस्थान आणि पोलिसांकडून मंदिरात प्रवेश देतानाच मोबाईलपासून सगळी तपासणी केली जात होती. साई मंदिर आणि परिसरात कडक बंदोबस्त दिसला असला तरी मंदिराशेजारील असणाऱ्या द्वारकामाई आणि चावडी परिसरात मात्र कोणताही पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही. मंदिरात एक वेळ जेवढी गर्दी नसेल त्यापेक्षा जास्त गर्दी बाहेरील परिसरात असते. दुकाने आणि भक्तांची गर्दी यात तुम्ही कोणतीही वस्तू सहजरित्या या ठिकाणाहून घेऊ जाऊ शकतात अस चित्र दिसून आलं. आमचे प्रतिनिधी आज कोणतीही ओळख न घेता या भागातून अनेक वेळा चकरा मारत असताना देखील कोणत्याही सुरक्षा रक्षक असो वा पोलीस यांनी विचारपूस सुद्धा केली नाही. यावरूनच गर्दीच्या ठिकाणच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं समोर आलंय. मंदिरात सुरक्षा व्यवस्था कडक मात्र बाहेर पोलिसच दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया साईभक्तांनी सुद्धा व्यक्त केली.
हरातील सीसीटीव्हीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित
जी परिस्थिती द्वारकामाई व चावडी परिसरात तीच परिस्थिती मंदिरातून बाहेर पडल्यावर देखील आहे. मंदिराच्या बाहेर कोठेही ना पोलीस बंदोबस्त ना सुरक्षेसाठी सीसीटीव्ही. दरम्यान शिर्डी शहरातील हॉटेल चालकांची बैठक घेणार असून बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेगळा फॉर्म भरून घेणार असल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे. शिर्डी शहरातील सीसीटीव्हीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून लवकरच याचा पाठपुरावा करून यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याची माहिती शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिर्डीसारख्या गर्दी असणाऱ्या देवस्थानच्या ठिकाणी जर सुरक्षिततेबाबत एवढी अनास्था असेल तर भाविकांच्या सुरक्षेचं काय? असा सवाल उपस्थित होत आहे.