शरद पवार यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह : राजेश टोपे
शरद पवार यांच्या सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर पवारांचीही चाचणी करण्यात आली. पवार सुरक्षित आणि व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
अहमदनगर : सिल्वर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रोटोकॉलनुसार सगळ्या गोष्टी पाळल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.
शरद पवार सातत्याने राज्यभर दौरा करत आहेत. मात्र सध्या राज्यात न फिरण्याची विनंती करणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. "शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही," असं राजेश टोपे म्हणाले.
सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोना, शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकांचा समावेश
सिल्वर ओकवरील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आणि स्वंयपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. या सगळ्यांवर उपचार सुरु आहे. तर स्वयंपाक करणाऱ्या महिलेवर वरळीतील डोम इथे उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान सुरक्षारक्षकांपैकी कोणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती आहे.
कराड दौऱ्यानंतर शरद पवार यांच्या स्टाफची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये एकूण सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कराड दौऱ्यानंतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री बाळासाहेब पाटील यांचीही कोरोना चाचणी त्यानंतर पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता आहे.
दरम्यान काल शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते. त्यानंतर रात्री ते पुन्हा मुंबईला आल्याची माहिती आहे.
दीड-दोन महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची आशा : टोपे कोरोना लसीची ऑक्सफर्ड आणि सिरममध्ये मानवी चाचणी सुरु आहे. ही ट्रायल पाहता दीड ते दोन महिन्यात लस उपलब्ध होण्याची आशा आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.