शरद पवारांचा दुष्काळ दौरा, आठवडभरात मुख्यमंत्र्यांना भेटून उपाययोजना सुचवणार
शरद पवार सध्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना ते भेट देत आहेत. शरद पवारांना आज बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यातील अनेक गावांना भेट दिली.
बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संपूर्ण राज्यात यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला मदत कशी करता येईल हे पाहण्याची आवश्यकता असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. राज्यातील दुष्काळी भागांचा दौरा करुन उपाययोजना सूचवण्यासाठी येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
शरद पवारांना आज बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यातील अनेक गावांना भेट दिली. यावर्षी 1972 पेक्षा भीषण दुष्काळ आहे. शेतकर्यांची पीके गेली आहेत, पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. सरकारने केलेली टँकर व्यवस्था अपुरी आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कामे नसल्याने नागरिकांना रोजगार नाहीत, 95 टक्के शेतकर्यांना पीक विमा मिळालेला नाही, असं चारही बाजूंनी संकट आलं आहे.
अशा परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सरकारने शेतकर्यांना मदत करावी. दुष्काळाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकार समोर मांडणार आहे. त्यासाठी येत्या 8 दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. चारा छावण्यांमध्ये प्रत्येक जनावरांमागे दिले जाणारे 90 रूपये हे कमी असल्याने ते वाढवून 100 ते 105 रूपये द्यावे, फळबागा वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं.
छावणी चालकांचे आंदोलन 8 दिवस स्थगित
बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याने छावणी चालकांनी उद्यापासून छावणी बंदचा इशारा दिला होता. या संदर्भात चारा छावणी संघटनेचे अध्यक्ष अशोक हिंगे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा मांडल्या. मात्र शेतकरी संकटात असताना त्यांना पुन्हा संकटात टाकू नका, तुमची समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडेल त्यासाठी थोडासा वेळ द्या अशी सूचना शरद पवारांनी केली. शरद पवारांच्या आवाहनानंतर उद्यापासूनचे छावणी बंद आंदोलन 8 दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.