Sharad Pawar : शरद पवार गटाकडून पक्षासाठी तीन नावांची मागणी, 'वटवृक्ष' चिन्हासाठी पवार आग्रही असल्याची माहिती
Sharad Pawar Vs Ajit Pawar : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाचा स्वतंत्र गटाचा दर्जा दिला असून त्यांना त्यांच्या गटासाठी नवीन नाव आणि चिन्हाची मागणी करावी लागणार आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर आता शरद पवार गटाने (Sharad Pawar) निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) तीन नावांची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत पक्षाचं चिन्ह म्हणून वटवृक्ष हे मिळावं यासाठीही शरद पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे.
शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी-
- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार
- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी निकाल देताना राष्ट्रवादी हा पक्ष आणि त्याचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं असल्याचं सांगितलं. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गटाची मान्यता देत त्यासाठी नवीन नाव आणि चिन्हाची मागणी करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या निर्देशानंतर आता शरद पवार गटाने तीन नावांची मागणी केली आहे. तर पक्षासाठी वटवृक्ष या चिन्हाची मागणी केली आहे.
निकाल विरोधात लागला तर काय करायचं हे धोरण आधीच तयार
केंद्रीय निवडणूक आयोगाने या आधी शिवसेनेचा निकाल देताना शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं होतं. तशाच प्रकारचा काहीसा निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत येऊ शकतो अशी काहीशी शंका शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांना होती. त्यामुळेच जर पक्ष चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागलाच तर काय करायचं हे धोरणही आधीच ठरलं होतं.
अजित पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7 आमदार
- झारखंड 1 आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील आमदार 15
- केरळमधील आमदार 1
- लोकसभा खासदार 4
- महाराष्ट्र विधानपरिषद 4
- राज्यसभा - 3
शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा
शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा लवकरच होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीवर होणार असल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचा व्हिप मानायचा का नाही हा शरद पवार गटासमोर प्रश्न असणार आहे.
ही बातमी वाचा: