(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सेना-राष्ट्रवादीत 'खंजीर' वॉर? शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत; शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीतेंचं वक्तव्य
शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलं आहे. तसेच यावर बोलताना संजय राऊत यांनी शरद पवार देशाचे नेते आहेत, असं वक्तव्य केलं आहे.
रायगड : शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झाला, अशा घणाघातही त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीत केवळ तडजोड आहे, असंही अनंत गीते म्हणालेत.
अनंत गीते म्हणाले की, "दुसरा कोणताही नेता, त्याला जगानं कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. महाविकास आघाडी ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे, तोपर्यंत आहे. ज्यादिवशी तुटेल त्यादिवशी काय?"
"काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे.", असंही ते म्हणाले.
शरद पवार देशाचे नेते : संजय राऊत
शरद पवार हे देशाचे नेते आहेत, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. अनंत गीते यांनी शरद पवार यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्यासंदर्भात बोलताना संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील व्यवस्था ही तीन पक्षांची एकत्र असलेले व्यवस्था आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. ही व्यवस्था 5 वर्ष टिकेल आणि या व्यवस्थेला महाराष्ट्राची मान्यता आहे."
दरम्यान, सध्या राज्यात स्थानिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी काळात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुका पार पडणार आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद मिटलेले नाहीत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसत आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. अशातच रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाद तसा जुनाच आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :