Pet Corner : देशातील पहिल्या पेट कॉर्नरची नवी मुंबईत सुरुवात
Pet Corner : देशातील पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण प्रसिद्ध गीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते पार पडले.
Pet Corner : नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना शहरात राबविण्यात येत आहे. पाळीव प्राण्यांना शौचासाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांच्या विष्ठेची स्वतः विल्हेवाट लावणे आवश्यक असून तसे न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असून त्यानुसार पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेने राबवली आहे. देशातील पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण प्रसिद्ध गीतकार शंकर महादेवन यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आपल्या 2 पाळीव कुत्र्यांसह गीतकार शंकर महादेवन यांनी या कार्यक्रमास हजेरी लावत नवी मुंबई मनपाचे कौतुक केले. तर शहरात 18 ठिकाणी असे पेट कॉर्नर उभारण्यात येणार असून ही संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका असल्याची प्रतिक्रिया मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेले नवी मुंबई शहर सतत नवनवीन संकल्पना राबविण्यात आघाडीवर राहिले आहे. याच धर्तीवर 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत 'पेट कॉर्नर' सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे. देशातील पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला असल्याने आनंद झाला असल्याचे गीतकार शंकर महादेवन यांनी सांगितले. वाशीमध्ये सुरू करण्यात आलेल्या पेट काॅर्नरवर शंकर महादेवन यांनी स्वताच्या टाॅगीला सुध्दा आणले होते. शहर स्वच्छतेमध्ये देशात सर्वोत्तम स्थान प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये नवनव्या संकल्पना राबवून विकासात्मक सुधारणा करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच लक्ष दिले आहे. 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये ओडिएफ कॅटॅगरीमध्ये 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले असून त्यापुढे वाटचाल करताना माणसांप्रमाणेच प्राण्यांचाही विचार करीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 'पेट कॉ़र्नर' ही अभिनव संकल्पना राबविली जात आहे.
सेक्टर 29 वाशी येथील नाल्याशेजारील हरीत पट्टयाच्या बाजूला 10 x 12 फूट आकाराच्या खोलगट जागेत वाळू टाकून त्या ठिकाणी पेट कॉर्नरची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना शौचासाठी या पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणे अपेक्षित आहे. पेट कॉर्नरच्या ठिकाणी प्राण्यांची विष्ठा उचलण्यासाठी आधुनिक प्रकारचे स्कूप ठेवलेले असून स्कूपने उचलेली विष्ठा टाकण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्लास्टिक पिशव्या तेथे ठेवलेल्या कचरापेटीमध्ये टाकावयाच्या असून कचरापेट्या नियमित स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याव्दारे शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेस प्रतिबंध होणार आहे.