Vidarbha : नागपूरमधील संविधान चौकात विदर्भवाद्यांचे राज्य सरकारविरोधात थाळी-फळी आंदोलन
'पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला थाळीभर न्याय व विदर्भातील प्रश्नांचा भळी विचार' या विषयाला घेऊन विदर्भवाद्यांनी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या नेतृत्वात संविधान चौकात 'थाळी फळी' आंदोलन केले.
Separate Vidarbha State Protest News : नागपुरात (Nagpur) नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात (Winter Assembly Session) विदर्भातील प्रश्नावर चर्चाच झाली नाही. तसेच राज्य सरकारकडून (Maharashtra Government) विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्यात आली, असा आरोप करत विदर्भवाद्यांनी शनिवारी (7 जानेवारी) संविधान चौकात आंदोलन केले.
यावेळी बोलताना विदर्भवादी मुकेश मासुरकर म्हणाले की, "कोरोनामुळे दोन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन झाले. यावेळी विदर्भातील अनेक मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारकडून विदर्भावर अन्याय करण्यात आला आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो मात्र विदर्भातील जनतेच्या प्रश्नांबाबत कोणालाही गांभीर्य नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे." याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून 'पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला थाळीभर न्याय व विदर्भातील प्रश्नांचा भळी विचार' या विषयाला घेऊन विदर्भवाद्यांनी लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीच्या नेतृत्वात संविधान चौकात 'थाळी फळी' आंदोलन केले.
माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनीही व्यक्त केली होती नाराजी
हिवाळी अधिवेशनात सुरु असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार डॉ. गिरीश गांधी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भात आल्यानंतर विदर्भातील (Vidarbha) सामाजिक, सांस्कृतिक, कलेच्या व राजकीय क्षेत्रातील लोकांशी भेटत प्रश्न समजून घेत होते. आता ही परिस्थिती बदलली आहे. नागपुरातील हे अधिवेशन, त्यातील लोकप्रतिनिधींचे वागणे पाहून मन विषण्ण होते. त्यामुळे, हे अधिवेशन गुंडाळावे अन् विदर्भात आलेल्या पाहुण्यांनी परत जावे अशी सर्वसामान्यांची भावना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.
दररोज गोंधळ अन् घोषणाबाजी
अधिवेशनात दररोज विरोधी पक्षाकडून विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी घोषणा देण्यात येत होत्या. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांकडूनही विरोधकांवर विविध आरोप करुन घोषणा देणे सुरु होते. याशिवाय दोन्ही सभागृहातही विविध मुद्द्यांवर वाद होऊ आतापर्यंत दररोज अनेकवेळा सभागृह दहा मिनिटे ते अर्धा तास तसेच गोंधळ वाढल्यावर चक्क दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले होते. त्यामुळे विधिमंडळात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर करण्यात आलेली आर्थिक तरतूद, राज्याच्या विकासाचा आराखडा किंवा विदर्भातील अनेक प्रश्नांचा उहापोह या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन अधिवेशनाच्या निमित्ताने धिंगाणा सुरु असल्याची टीकाही गांधी यांनी केली होती.
ही बातमी देखील वाचा...