एक्स्प्लोर
राजकारणातील विद्यापीठाची अखेर, पतंगराव कदम अनंतात विलीन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं शुक्रवारी 9 मार्च रोजी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं.
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव आज पहाटेच मुंबईहून पुण्याकडे रवाना झालं होतं. पतंगराव यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते. पतंगराव यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी मोठी गर्दी केली. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.
LIVE UPDATE
- अनेक राजकीय नेत्यांनी पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
- पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी वाढती गर्दी
- पतंगराव कदम यांच्या अंत्ययात्रेला थोड्याच वेळात सुरुवात, पार्थिव सिंहगड बंगल्यावरुन धनकवडी येथे भारती विद्यापीठात ठेवणार
पुण्यात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी धनकवडी येथे भारती विद्यापीठात सकाळी 10 वाजता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पार्थिव सांगलीकडे रवाना होईल.
सांगलीतही वांगी (जि. सांगली) येथील सोनहिरा कारखान्यावर दुपारी दोन वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मग चार वाजता पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पतंगरावांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्यात काँग्रेससह सर्वच पक्षांचे मोठे नेते हजेरी लावणार आहेत. लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं शुक्रवारी 9 मार्च रोजी वयाच्या 72 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेत्यांनी लीलावती रुग्णालयात जावून पतंगरावांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पतंगराव कदम यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. पतंगराव कदम यांचा अल्पपरिचय पतंगराव कदम यांचा जन्म 1945 रोजी सांगली जिल्ह्यातील सोनसळ या गावी झाला. गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना 4 ते 5 किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. 1961 साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. 1964 साली वयाच्या 20 व्या वर्षी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली. राजकीय कारकीर्द 1985 ते 2014 अशा कालावधीतील सात विधानसभा निवडणुकीत पतंगराव कदम भिलवडी-वांगी आणि पलूस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले. सलग सातवेळा विजयी होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. 1968 साली ते एसटी महामंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आणि तेव्हापासून गेली 40 हून अधिक वर्षे ते महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. पश्चिम महाराष्ट्रातील 'लोकनेता' म्हणूनही त्यांचा गौरव झाला.- जून 1991 ते मे 1992 - शिक्षण राज्यमंत्री
- मे 1992 ते 1995 - शिक्षणमंत्री (स्वतंत्र खाते)
- ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2004 - उद्योग, व्यापार, वाणिज्य आणि संसदीय कामकाज खात्यांचे कॅबिनेट मंत्री
- नोव्हेंबर 2004 पासून पुढे - पुनर्वसन आणि मदतकार्ये या खात्यांचे मंत्री
- प्रभारी अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
- डिसेंबर 2008 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - महसूल, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन आणि शालेय शिक्षण
- मार्च 2009 पासून - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन महसूल खाते
- नोव्हेंबर 2009 पासून पुढे - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र शासन - वनविभाग
- 19 नोव्हेंबर 2010 ते 2014 - कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य - वनविभाग, पुनर्वसन आणि मदतकार्ये, भूकंप पुनर्वसन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement