(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bavadhan Bagad Yatra : बगाड यात्रेमुळे बावधन कोरोनाच्या कचाट्यात; ग्रामस्थांनंतर 11 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण
सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर यात्रेच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सातारा : प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवून साताऱ्याच्या बावधनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बगाड यात्रेमुळे नवं संकट उद्भवलंय. यात्रेत सहभागी झालेल्या 61 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं यापूर्वी निष्पन्न झालं होतं. आता या यात्रेच्या वेळी उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण 11 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. बगाड यात्रेमुळे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 75 वर जाऊन पोहोचली आहे.
सातारा जिल्ह्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यात्रा झाल्यापासून गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर यात्रेच्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी 83 जणांवर अटकेची कारवाई देखील केली होती.
पाहा व्हिडीओ : Bavdhan Bagad यात्रेमुळे ग्रामस्थांनंतर आता 11 पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण
राज्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सातारा जिल्हा देखील मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बावधनच्या बगाड यात्रेच्या आयोजनावर बंदी घातली होती. बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी आणि यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केलं होतं. परंतु प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत बावधनची बगाड यात्रा 2 एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली होती. यात्रा झाल्यानंतर आता गावातील 61 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. अशातच आता हा आकडा वाढून 75 वर पोहोचला आहे. शिवाय बगाड यात्रेमुळे वाई तालुक्यातही कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे.
83 जणांना अटक आणि जामीन
बावधन बगाड यात्रा भरवल्या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात अडीच हजार बावधनकरांवर गुन्हे दाखल करण्यात आले होती. यातील 83 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना वाई न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पाच हजार रुपयांच्या अनामत रकमेवर जामीन दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
साताऱ्यातील बावधनच्या बगाड यात्रेनंतर कोरोना रुग्ण वाढले, गावातील 61 जण पॉझिटिव्ह