अतिक्रमणाच्या वादातून सरपंचाकडून महिलेस मारहाण, धुळे जिल्ह्यातील पेरेजपूर येथील घटना
एकीकडे सरपंचाने महिलेस मारहाण केली म्हणून सरपंचावर टीका होत असतांना त्याच सरपंचाच्या समर्थनार्थ पेरेजपूर गावातीलच काही महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून महिलेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेजपूर गावाचे सरपंच मनोज देसले यांनी अतिक्रमणाच्या वादातून एका महिलेला गावकऱ्यांसमोर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनमध्ये परस्पराविरुध्द फिर्याद दाखल करण्यात आलीय. सरपंचानी महिलेस मारहाण केल्याचं समर्थन होऊच शकत नाही . मात्र या घटने प्रकरणी सोशल मीडियावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. एकीकडे सरपंचाने महिलेस मारहाण केली म्हणून सरपंचावर टीका होत असतांना त्याच सरपंचाच्या समर्थनार्थ पेरेजपूर गावातीलच काही महिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घालून सरपंचाला मारहाण ,शिवराळ भाषा करण्याऱ्या महिलेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केलीय .
सदर महिला व तिचे कुटुंब एका गरीब शेतकरी कुटुंबाला त्यांच्या पडलेल्या घराच्या भिंत बांधण्यास मज्जाव करीत होते . सदर महिलेचे घर अतिक्रमण मध्ये आहे . सदर बांधकामास सरपंच मनोज देसले गेल्या दीड महिन्यापासून पाठपुरावा केल्यानं तसेच कायदेशीर बाबी पूर्ण करून पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे आदेश निघाल्यानं या कुटुंबाचा सरपंच मनोज देसले यांच्यावर राग आहे . तरीसुद्धा या कुटुंबाने एका गरीब कुटुंबाला भर पावसात घराची भित बांधण्यास मज्जाव करत त्या कुटुंबाला मारहाण केली .
सरपंच मनोज देसले यांनी सरपंच या नात्याने समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र या आधी देखील सरपंचांनी त्यांचे अतिक्रमण बांधकाम थांबविल्याचा राग मनात होता. प्रथम त्या महिलेनेच सरपंचांना शिवीगाळ सुरू करून सरपंचाला मारहाण सुरू केल्याचं सरपंच तसेच काही स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. त्या महिलेस समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही . या महिलेविरुद्ध कठोर कारवाई होण्यासाठी मंगळवारी रात्री पेरेजपूरच्या महिलांनी साक्री पोलीस स्टेशनला घेराव घातला होता . सरपंचानी महिलेस मारहाण केल्याचं समर्थन होत नाही . मात्र सोशल मीडियावर या प्रकरणी दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत .