(Source: ECI | ABP NEWS)
Santosh Deshmukh murder case : सर्व गावकरी आंदोलनात सहभागी होणार, सरकारकडून कोणतीही चर्चा नाही, नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
Santosh Deshmukh Murder Case : सर्व गावकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने सर्वजण आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.

Santosh Deshmukh Murder Case : पोलीस अधीक्षकांचा (Superintendent of Police) आम्हाला निरोप आला आहे, त्यानुसार गावकरी आणि आम्ही एसपी ऑफिसला जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. त्यातून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याची माहिती धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी दिली. सकारात्मकता दाखवली तर गावकरी विचार करतील. सर्व जण आंदोलनात सहभागी होणार आहेत. साखळी पद्धतीने सर्वजण आंदोलनात सहभागी होतील असे देशमुख म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी, या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ उद्यापासून आंदोलन करणार आहेत.
आमच्या आंदोलनासंदर्भात सरकारकडून कोणतीही चर्चा नाही
ठराविक लोकांचा अद्याप निरोप नाही, सर्वजण यात सहभागी होणार आहेत. सरकारचे शिष्टमंडळ भेटीला नाही किंवा निरोप देखील नाही. त्यांची भूमिका वेगळी आणि आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे देशमुख म्हणाले. गावकरी याबाबत निर्णय घेतील असेही धनंजय देशमुख म्हणाले. सुरेश धस यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय चर्चा केली याबाबत आम्हाला दुपारनंतर माहिती मिळेल. त्यांनी बोलावले म्हणून आम्ही त्यांच्या भेटीला जात आहोत असेही देशमुख म्हणाले. आमच्या आंदोलनासंदर्भात सरकारकडून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. आपण सरकारच्या नियोजनावर काही बोलू शकत नाही. आम्ही आमच्या नियोजनावर बोलणार असल्याचे देशमुख म्हणाले. आंदोलन करायचं की स्थगित करायचं याबाबतच निर्णय सर्व गावकरी घेतील असे धनंजय देशमुख म्हणाले.
मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता
संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी या ग्रामस्थांनी करो या मरोचा इशारा दिला आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि सर्व गटातील लोकांसह महिलाही या आंदोलनात सामील होणार आहेत. दोन दिवस अन्न त्याग आंदोलन केलं जाईल. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुखांची झाली होती हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून संतोष देशमुख यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं. त्या गाडीतून 5 ते 6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करु लागले. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. त्यानंतर देशमुखांची आरोपींनी हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन राजकी वातावरण चांगलच तापलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलच लावून धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या:

























