(Source: ECI/ABP News/ABP Majha)
निवृत्त अधिकारी 'वर्षा' बंगल्यावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका घडवून आणतोय; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटायला गुंडांची रांग लागली आहे. वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत.
नवी दिल्ली : पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीच्या फोटोवरून पुन्हा एकदा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक निवृत्त पोलीस अधिकारी वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका घडवून आणत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषेदत बोलतांना राऊत यांनी हे आरोप केले आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “ यापुढे मी रोज असे फोटो ट्विट करत राहणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गुंड टोळ्या भेटून काय चर्चा करत आहेत. विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी मदत करणार आहात का?, मुख्यमंत्र्यांच्या मुलाला भेटायला गुंडांची रांग लागली आहे. वर्षावर रोज गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत. एक निवृत्त पोलीस अधिकारी हे घडवून आणतोय. नेहरूंनी देश आळशी बनवला, तर तुम्ही काय करताय. गुंड टोळ्यांच्या हातात देश देताय का? असा प्रश्न यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदी डोळ्याला पट्टी लावून बसलेत....
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यापासून राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जाहीरपणे गळाफास घेऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्यावर शब्द तरी उच्चारला का?, सांगा तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करतायेत. भाजपकडे फक्त एकच प्रॉडक्ट असून, मोदींशिवाय त्यांच्याकडे दुसरे प्रॉडक्ट आहे का?, हा देश हुकूमशाहीकडे चालला आहे. चंदीगडची महापौर निवडणुक पाहिल्यावर हुकूमशाही कोणत्या थराला गेली आहे हे दिसत आहे. मोदींना हे दिसत नाही की, त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो राऊतांनी ट्वीट केला आहे.
संजय राऊतांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील गुंड निलेश घायवळ यांचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते..आज ही काय अवस्था करुन ठेवली आहे मोदी शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने.
इतर महत्वाच्या बातम्या :