एक्स्प्लोर
उकाड्यामुळे अंगणात झोपणं जीवाशी, सांगलीत भिंत कोसळून तीन महिलांचा जागीच मृत्यू
आकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सांगली : उकाडा असल्याने अंगणात झोपणं सांगलीतील तीन महिलांच्या जीवावर बेतलं आहे. शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सांगलीत मोही गावात रात्री पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हौसाबाई विष्णू खंदारे (वय 80 वर्ष), कमल नामदेव जाधव (वय 50 वर्ष), सोनाबाई विष्णू खंदारे (वय 50 वर्ष) अशी मृत महिलांची नावे असून या माय-लेकी आहेत.
रात्री प्रचंड उकाडा असल्याने हे सर्वजण आपल्या पत्र्याच्या घरासमोरील पटांगणात झोपले होते. झोपण्याच्या जागी डोक्याकडील बाजूला शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत होती, जी रात्री अचानक कोसळली. यात भिंतीच्या शेजारी झोपलेल्या तिघींच्या डोक्यावर ढिगारा कोसळली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तर सावित्री तुळशीराम हसबे (वय 45 वर्ष) या जखमी आहेत. त्यांना करंजेमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह करंजे इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
आकस्मिक घटनेत एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















