Sameer Wankhede Case : नवाब मलिकांच्या विरोधात समीर वानखेडेंचे वडील कोर्टात, 1.25 कोटींचा मानहानीचा दावा
Sameer Wankhede vs Nawab Malik : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात समीर वानखेडे यांच्या वडिलांनी कोर्टात धाव घेतली आहे.
Sameer Wankhede vs Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या जात आहेत. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांच्याकडूनही त्यांना उत्तरं दिली जात आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे, जातीच्या बोगस दाखल्याद्वारे समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा हा होय. तसेच समीर वानखेडे जन्मानं मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे नसून दाऊद वानखेडे असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. मलिकांच्या या आरोपाविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. आज, सोमवारी याची सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Drug Case) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी त्यानंतर आरोपाचे बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले. सततच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर एक कोटी 25 लाख रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांच्याआधी भाजप नेता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे.
वानखेडेंच्या वकीलाचं काय म्हणणं?
नवाब मलिक यानी वारंवार प्रश्न उपस्थित केल्यानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची एनसीबी पथकामार्फत चौकशी सुरु झाली आहे. ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अर्शद शेख यांच्यानुसार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक वानखेडे कुटुंबाला सतत फ्रॉड म्हणत आहेत. तसेच त्यांच्या जाती-धर्मावरही प्रश्न उपस्थित करत आहे. नवाब मलिक दररोज कुटुंबाची बदनामी करत आहेत. तसेच ज्ञानदेव वानखेडे यांची मुलगी क्रिमनल लॉयर यास्मिन हिचं करिअर संपवत आहेत. नवाब मलिक यांच्या सततच्या आरोपांमुळे वानखेडे कुटुंबाना मानसिक आणि सामाजिक त्रास होत आहे.
ज्ञानदेव वानखेडे काय म्हणाले?
पूर्ववैमन्यसातून नवाब मलिक, समीर वानखेडे आणि कुटुंबाला बदनाम करत आहेत. या आरोपांमुळे समीर वानखेडे आणि कुटुंबाची प्रतिमा मलीन होत आहे. सोशल मीडियातून धमक्याही मिळत आहेत. तसेच सतत आपत्तीजनक पोस्ट केल्या जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे मानसिक त्रास होत आहे. सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमात प्रसारित झाल्याल्या बातम्या काढून टाकण्यात याव्यात.
जावायाच्या आरोपांमुळे मलिक भडकले -
जावायाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि कुटुंबावर आरोपांची मालिका सुरु केली. जावायाला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक सोशल मीडियाच्या माध्यमातून अथवा पत्रकार परिषद घेऊन बिनबुडाचे आरोप करत आहेत.