(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhaji Bhide : समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका: संभाजी भिडे
कोट्यवधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी थेट सरकारला सुनावलं.
Sambhaji Bhide : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा उभारण्याचा आणि त्यांचा आयुष्याचा काही संबंध नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हा स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी (sambhaji bhide) थेट सरकारला सुनावलं आणि सागरी स्मारकाला जाहीर विरोध दर्शवला. पुण्याच्या जुन्नरमध्ये गडकोट मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
भिडेंनी म्हटलं की, राज्यात नको इतके पुतळे आहेत. आता अरबी समुद्रात स्मारक उभारला जात आहे. त्या स्मारकाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा काहीच संबंध नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये, अशा शब्दात सरकारला सुनावत त्यांनी सागरी स्मारकाला विरोध दर्शवला. आमच्या छत्रपती शिवरायांना इंग्लंडच्या प्रसुतीगृहातून बाहेर काढा. त्यांची जयंती भारतीय हिंदू पंचांगानुसारच झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
भिडे पुढे म्हणाले की, जिजामाता 12 जानेवारी रोजी जन्मलेल्या नाही आहेत. पौष पोर्णिमेला जन्मल्या आहेत. ही तिथी मानली पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र सुरुवतीला एक एक गोष्ट सोडवण्याची गरज आहे. महाराष्ट्राची लेकरं राज्य करत आहेत. त्यामुळे ते नेमकं काय करतात ते बघू म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जगाचा बाप कोण याचं उत्तर अमेरिका, रशिया देईल. हे सगळे देश हरामखोर आहेत. जगात देवत्व आणि श्रद्ध टिकवायची असेल तर हिंदूस्तानच असला पाहिजे, असंही ते म्हणाले. सरकारे सारखी उलथीपालथी होत आहेत,हा त्यांचा धंदा आहे,ते दोन्हीही आपलेच! हिंदुत्वाचे ठेकेदार आहेत.जुने आणि नवे सगळे जे आहे ते देखावे आहेत, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 289 लढाया तर छत्रपती संभाजी महाराजांनी 134 लढाया लढल्या, हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले, त्यांचे स्मरण करण्यासाठी मिरवणूका, उत्सव सोहळे करून चालणार नाही. तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हजारो धारकरी मोहिमेत सहभागी
29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान या पदयात्रा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो धारकरी या मोहिमेत सहभागी झाले होते. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर मोहिमेची सांगता झाली. फेटे, टोप्या परिधान केलेले, राज्याच्या विविध भागांसह कर्नाटक राज्यातून हे धारकरी मोहिमेत सहभागी झाले होते.