एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
झिनी कोलमच्या नावाखाली समान दिसणाऱ्या तांदळाची विक्री, भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न
प्रसिद्ध असलेल्या वाडा येथील झिनी कोलमच्या नावाखाली त्यासारखाच दिसणाऱ्या तांदळाची विक्री होत आहे. ग्राहकांची होणारी फसवणूक बंद करण्याच्या दृष्टीने तसेच स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या तांदळाला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
पालघर : राज्यात प्रसिद्ध असलेल्या वाडा येथील झिनी कोलमच्या नावाखाली त्यासारखाच दिसणाऱ्या तांदळाची विक्री होत असून यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक बंद करण्याच्या दृष्टीने तसेच स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, यासाठी वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्थेने कृषी दिनाचे औचित्य साधून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केला आहे.
पालघर मधील वाडा येथील कोलम तांदूळ प्रसिद्ध असून सध्या याच वाडा कोलम तांदळाच्या नावाने बाजारात ग्राहकांची फसवणूक होत असल्याने वाडा येथील झिनी कोलमला भौगोलिक मानांकन देण्यात यावं अशी मागणी जोर धरू लागलीय. ‘वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेच्या वतीने ‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’च्या माध्यमातून प्रा. गणेश हिंगमिरे हे चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी केंद्राकडे वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल करणार आहेत.
बाजारात वाडा कोलमच्या नावाने सर्रास विकला जाणाऱ्या इतर वाणाच्या तांदळामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे वृत्त एबीपी माझाने अनेकवेळा प्रसिद्ध केले होते. बनावट तांदळाच्या स्पर्धेमुळे संपुष्टात येऊ पाहणाऱ्या या वाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथील शेतकरी कृषिभूषण अनिल पाटील, संजय पाटील (बायफ जव्हार), वैभव पाटील (आपटा), भालचंद्र ठाकरे, दिलीप शिलोत्री यांच्यासह 13 सदस्यीय समिती तसेच हा वाण जपून ठेवणारे वाड्यातील शेतकरी एकत्रित आले आहेत. त्यांनी वाडा कोलम या वाणाला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी या वाणाचे आनुवंशिक पुरावे, ऐतिहासिक नोंदी संकलित करणे, तांदळाची वैशिष्ट्ये आणि इतर पुराव्यांचे संकलन करणे तसेच या संदर्भात आवश्यक कागदपत्रे पूर्तता करणे हे आव्हानात्मक काम कृषी विभागाच्या सहकार्याने पूर्ण केले.
2016 मध्ये सुमारे अडीच हजार हेक्टरवर झीणी कोलमची लागवड केली जात असे. मात्र बनावट नावाने विकल्या जाणाऱ्या तांदळामुळे वाडा कोलमच्या लागवडीचे प्रमाण झपाट्याने कमी झाले. सध्या वाडा परिसरात दीडशे हेक्टरवर झिनी कोलमची लागवड केली जातेय. मानांकनामध्ये घोलवडचा चिकू, वेंगुर्ल्याचा काजू, रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील कोकम, रत्नागिरी हापूस, अलिबागचा सफेद कांदा, विदर्भातील दिवापूरची मिरची, मराठवाडय़ाचा केसर आंबा, जालन्याची मोसंबी, बीडचे सीताफळ, उस्मानाबादची शेळी, पश्चिम महाराष्ट्रामधील पुण्यातील आंबेमोहर तांदूळ, सासवड येथील अंजीर, सातारा कोरेगाव येथील वाघ्या घेवडा, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी, कोल्हापूरचा गूळ, आग्रा घनसाळ येथील तांदूळ, सांगलीचा बेदाणा, हळद, नाशिकमधील द्राक्ष, लासलगाव येथील कांदा यांचा समावेश आहे. तसाच वाडा झिनी कोलमचा समावेश व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे .
या मानांकनामुळे झिनी (वाडा) कोलमचे उत्पादन घेणाऱ्या वाडा परिसरातील शेतकऱ्याला स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे. बनावट तांदळाच्या स्पर्धेमुळे संपुष्टात येऊ पाहणाऱ्या या वाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मानांकन मिळविण्यास होणाऱ्या प्रयत्नाला आता सरकारने हातभार लावावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement