रोहित पवारांचं लॉचिंग, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसणार?
लोक मंत्रालयात बसतात, मुंबईत बसून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र आम्ही इथे लोकांमध्ये फिरुन परिस्थितीची पाहणी करत आहोत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
सातारा : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं मोठं नाव आहे. याच पवार घराण्यातील चौथी पीढी राजकारणात सक्रिय झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने लॉन्च करत, थेट लोकसभेची उमेदवारी दिली होती. आता रोहित पवार यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत राष्ट्रवादी दिसत आहे.
शरद पवार सध्या राज्यातील दुष्काळ दौऱ्यावर आहेत. शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात रोहित पवार यांची उपस्थिती प्रकर्षाने दिसत आहे. विशेष म्हणजे रोहित पवार देखील दुष्काळी भागात बारामती अॅग्रोच्या माध्यमातून काम करत आहेत.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित पवार यांनी माण तालुक्यातील गावांना 30 टँकर पाणी देणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर टँकरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे रोहित पवार यांचं लॉचिंग झालं असं म्हणावं लागेल. एकूणच पार्थ पवारांनंतर रोहित पवार ही पवारांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.
लोक मंत्रालयात बसतात, मुंबईत बसून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र आम्ही इथे लोकांमध्ये फिरुन परिस्थितीची पाहणी करत आहोत, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. आपल्या राजकारणातील लॉचिंगबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, लॉचिंग त्यांचं होतं जे नवीन येतात. मी पवार साहेबांसोबत फिरत आहे, त्यामुळे सक्रीय असून हे माझं लॉचिंग नाही.
रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी केलंल वक्तव्य असो, घराणेशाहीबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला दिलेलं उत्तर असो किंवा शिवसेना-भाजप युतीला दिलेली सर्कसची उपमा असो, अशा अनेक वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले. जिल्हा परिषदेचे सदस्य असल्याने त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे विधानसभेत उमेदवारी मिळाल्यास त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज लागणार नाही.