Rohit Pawar : राज्यात भाजपचं सरकार, त्यामुळे अण्णा हजारे आजारी असतील आणि आराम करताहेत; रोहित पवारांचा खोचक टोला
Rohit Pawar On Anna Hazare : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आहे. त्यावरून आता त्यांनी अण्णा हजारे यांनाही टोला लगावला.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. महायुतीचं सरकार आल्यानंतर आता पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा आहे असंही रोहित पवार म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं.
अण्णा हजारे आजारी असतील, त्यामुळे आराम करत आहेत
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे ईव्हीएम मशीन विरोधात सध्या पुण्यामध्ये आंदोलन करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (SP) चे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना खोचक टोला लगावला आहे. बाबा आढाव यांच्यासारखे खरे सामाजिक कार्यकर्ते लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे भाजपचे सरकार आल्यानं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत नाहीत. ते आजारी असतील त्यामुळे आराम करत असतील असा खोचक टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणार अशी चर्चा
महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगताना दिसत आहे. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं म्हटल आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या अशा जागा आल्या आहेत की अजित पवार यांनी भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तर एकनाथ शिंदे यांची चांदी आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपला अडचणी करण्याचा प्रयत्न केला तर अजित पवारांची चांदी आहे अशी सध्याची स्थिती आहे. मात्र या गोष्टी दोघांना माहीत असल्याने त्यांना भाजपचं ऐकण्याशिवाय पर्याय नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. पंकजा मुंडे यांना देखील मुख्यमंत्री करणार असल्याची चर्चा लोकांमध्ये असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय.
राम शिंदे यांनी मोदी-शाहांनाच आव्हान दिलं
कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी फेरतपासणीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे.. राम शिंदे यांनी फेर तपासणी करण्याची मागणी करत एक प्रकारे अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिलं असल्याच रोहित पवार यांनी म्हटलं आहे. व्हीव्हीपॅट मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही. पण ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.
ही बातमी वाचा: