एक्स्प्लोर
Advertisement
कोटे गुरुजींच्या कर्तृत्त्वाला सलाम, एकट्याने 4 गावांसाठी बंधारा बांधला!
सोलापूर: कर्जबाजारीपणा, नापिकी, अवर्षण आणि अतिवृष्टी, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटाने हतबल होऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या करुण कहाण्या आपण ऐकत आलो आहोत. पण स्वतःची पदरमोड करून संकटातल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मोठ्या मनाच्या शेतकऱ्यांच्या प्रेरक कथा तशा फारशा उजेडात येत नाहीत.
अक्कलकोट तालुक्यातील इंगळगी गावातल्या एका वृद्ध शेतकऱ्याने स्वखर्चातून आख्खा बंधारा बांधलाय. यामुळे आसपासच्या चार गावांना पाण्याची शाश्वती मिळाली आहे.
इनोंदगी कोटे असं या 75 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. कोटे हे निवृत्त शिक्षक असून त्यांनी तब्बल एक किलोमीटर लांबीचा, तीस मीटर रुंद आणि दहा फूट खोलीचा बंधारा बांधला आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या इंगळगी गावातला हा बंधारा सध्या चर्चेचा विषय ठरलाय. तसाच तो गावकऱ्यांच्या अभिमानाचाही.
इनोंदगी कोटे हे निवृत्त झाल्यापासून वडिलोपार्जित शेती करतात. पण गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून पदरमोड केला आणि कायमस्वरुपी मजबूत बंधारा निर्माण केला.
जवळपास बारा दिवस हे काम चाललं. बाहेर गावातून यंत्रसामुग्री मागवली. स्वतः दिवसरात्र वेळ दिला. पाच लाखांचा खर्च आला. सध्याच्या शेतीसाठीच्या प्रतिकूल परिस्थितीत पाच लाखांचा खर्च करणं तसं जिकीरीचं काम. पण लोकांची सोय होते म्हणून मोठ्या मानाने पदरमोड करणाऱ्या कोटे गुरुजींनी हे काम तडीस नेलं.
वर्षानुवर्षे जे काम शासनाला जमलं नाही ते कोटे गुरुजींनी बारा दिवसात करून दाखवलं. हांजगी, तिलाटी, आचेगाव, इंगळगी या गावांना या बंधाऱ्याच्या पाण्याचा उपयोग होणार आहे.
2015 च्या दुष्काळी स्थितीत याच कोटे गुरुजींनी आपली 20 एकराची ऊसाची बहरलेली शेती छावणीसाठी खुली करून हतबल झालेल्या बळीराजाला दिलासा दिला होता. तब्बल दोन महिने पशुपालक कोटे गुरुजींच्या शेतात वास्तव्याला होते.
या छोट्याशा बंधाऱ्यामुळे आसपासच्या चार गावांची तहान भागणार आहे. यावेळी पाऊस चांगला झाला तर या शेतकऱ्याच्या तळमळीला यश येणार आहे.
या वयोवृद्ध आणि दिलदार शेतकऱ्याचं नाव गावातला प्रत्येकजण अभिमानाने घेतोय. दक्षिण तालुक्यातील इंगळगीसह आसपासची गावं दुष्काळाच्या झळा सोसत होती. या बंधाऱ्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आज ज्या ठिकाणी हा बंधारा निर्माण झालाय तो एक ओढा होता. प्रयेक वर्षी पडलेला पाऊस या ओढ्यातून वाहून जायचा. नागमोडी वळणाचा हा ओढा तसा निरुपयोगी ठरला होता. गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे ओढ्याच्या दुरुस्तीची मागणी केली. अखेर कोटे गुरुजींनी गावकऱ्यांची ही मागणी स्वखर्चातून पूर्ण केली.
आता मात्र पावसाळ्यात जमिनीवर पडणारं पाणी या बंधाऱ्यात साठणार आहे. शिवाय या पाण्यामुळे पंचक्रोशीतील पाणी पातळीत लक्षणीय वाढ होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणाऱ्या कोटे गुरुजींच्या दातृत्वाला तोड नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement