एक्स्प्लोर
आरक्षण आर्थिकदृष्ट्या असावं, मग तो कुठल्याही जातीचा असो : पवार
"जातीनिहाय विचार करु नये. विचार करायचा असेल, तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे, तो कुठल्याही जातीचा असेल, त्याला आरक्षण दिले पाहिजे."
पुणे : आरक्षणाचा जातीनिहाय विचार करु नये. विचार करायचा असेल, तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे, मग तो कुठल्याही जातीचा असेल, त्याला आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. पुण्यात ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. त्यावेळी पवारांनी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली.
शरद पवार नेमके काय म्हणाले?
राज ठाकरे : खासगीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असताना, शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या उपलब्ध नसताना आता खासगी क्षेत्रात नोकऱ्या आरक्षणावर मिळणारच नाहीत.
शरद पवार : हा फार संवेदनशील विषय आहे. आरक्षण समाजातील ज्या दुबळ्या लोकांना आहे, दलित, आदिवासी इत्यादी. जनरली त्याबद्दल कुणाला तक्रार नाही. आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात. माझं स्वच्छ त्याच्यात मत आहे की, यासंबंधी जातीनिहाय विचार करु नये. विचार करायचा असेल, तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे, तो कुठल्याही जातीचा असेल, त्याला आरक्षण दिले पाहिजे.
जात नाही, कर्तृत्व बघा : पवार
याचसंदर्भात शरद पवार यांना राज ठाकरे यांनी पुढे विचारले, “प्रत्येक महापुरुषाकडे काही जण जात म्हणून पाहतात, ते बदलावंसं वाटत नाही का?” त्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “जात नाही, कर्तृत्व बघा, असा बाळासाहेबांचा संदेश होता. चंद्रकांत खैरेंसारखी व्यक्ती जातीधर्मापलिकडे जाऊन बाळासाहेबांनी पाहिली. बाळासाहेबांनी कधी जात पाहिली नाही, कर्तृत्व पाहिलं.”
आर्थिकदृष्ट्या आरक्षण असावं का, या प्रश्नाला धरुन महाराष्ट्रात कायमच चर्चांचे फड रंगत असतात. मात्र शरद पवार यांच्यासारख्या महाराष्ट्रासह राष्ट्रीय स्तरावरील अनुभवी आणि मुरब्बी नेत्याने आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका आणखी खोल चर्चेचा विषय ठरणार आहे. आता यावर इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महामुलाखत : राज ठाकरे यांच्या रोखठोक प्रश्नांना शरद पवार यांची सडेतोड उत्तरं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement