Aditya Thackeray: संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांना मागणी...'
Aditya Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील घराची रेकी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हे दोन अज्ञात व्यक्ती संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेनंतर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणी लक्ष घालण्याबाबत त्यांनी सांगितलं असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
फडणवीसांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आज देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. आज संजय राऊत घराची रेकी झाली. त्यांच्या घराची रेकी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन अज्ञात लोक बाईक वर आले, राऊत यांच्या दिल्लीच्या घराची सुद्धा रेकी झाली आहे. आज मुख्यमंत्री यांना मागणी केली आहे की, हे लोकं कोण आहेत याचा तपास करावा. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. संजय राऊत यांच्या जीवाला धोका आहे त्यावर उपयोजना केल्या पाहिजे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
सुरक्षा देणं घेणं किंवा काढणं याबाबतचे राजकीय निर्णय कधीकधी होत असतात. गेल्या अडीच वर्षात सुडाचं राजकारण झालं, नको त्यांना सुरक्षा दिली गेली. पाहिजे त्यांची सुरक्षा काढली गेली. पण मला त्याच्यात जायचं नाही. काल आपण जे पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यामध्ये होतं, सुडाचं राजकारण करणार नाही. राज्याला एकत्र येऊन पुढे चालणार. विरोधी किंवा त्यांच्यासोबतचे नेते असतील भेदभाव होणार नाही. आज देखील त्यांनी बीडवरती उत्तर दिलेलं आहे. कायदा सुव्यवस्था मोडलेला चालणार नाही याची सुरुवात इथपासून होते. मी आता त्यांना विनंती केलेली आहे. संजय राऊत कोणत्याही बाजूचे असतील ते कोणत्या विचारधारेचे असतील पण ज्याला गरज आहे त्याला सुरक्षा देणे गरजेचे आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आम्ही जाऊन एवढीच विनंती केली होती. संजय राऊतांच्या जीवाला धोका वाटत आहे. त्यांच्यावर कुठेतरी उपाययोजना व्हावेत, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय जो आहे, तो पक्षाचे अंतर्गत आहे. तो आम्ही सगळे आमदार म्हणून घेणार आहोत. जे तुम्ही आता भेटी मोजत चाललंय,ते मुख्यमंत्री आहेत. पुढच्या पाच वर्षात अनेकदा भेटी होतील, असंही ते पुढे म्हणालेत.