Smita Thackeray : रिसेप्शनिस्ट ते ठाकरेंची सून, कोण आहेत स्मिता ठाकरे?
Smita Thackeray : स्मिता ठाकरे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. स्मिता ठाकरे यांच्याकडे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं जात असे.
मुंबई : खरी शिवसेना (Shiv Sena) कुणाची यावरून शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आता न्यायालयापर्यंत पोहोचला असून शिवसेनेला रोज एकामागून एक धक्के बसत आहेत. त्यातच आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray ) यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे (Smita Thackeray ) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीनंतर स्मिता ठाकरे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवाय या भेटीनंतर आता स्मिता ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
या भेटीनंतर माध्यमांसोबत बोलताना 'मी राजकारणात नाही. मी समाजसेवा करते, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. परंतु, मी राजकारणात नाही, असं म्हणणाऱ्या स्मिता ठाकरे यांच्याकडे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं होतं हे अनेकांना माहित नाही.
स्मिता ठाकरे या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनबाई आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांच्या त्या पत्नी आहेत. याच स्मिता ठाकरे यांच्याकडे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तराधिकारी म्हणून पाहिलं गेलं होतं.
रिसेप्शनिस्ट ते ठाकरेंची सून
स्मिता या विवाहापूर्वी पासपोर्ट ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या. याच दरम्यान त्यांची जयदेव ठाकरे यांच्यासोबत ओळख झाली. या ओळखीनंतर काही दिवसांनी 1987 मध्ये जयदेव ठाकरे आणि स्मिता यांचा विवाह झाला. विवाहा पूर्वी त्या स्मिता चित्रे होत्या. जयदेव यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्या स्मिता ठाकरे झाल्या. परंतु, 1995 पासून जयदेव आणि स्मिता यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.
राजकारणात सक्रिय
1995 ते 1999 या काळात युतीचे सरकार आल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय होत्या. परंतु, 1999 मध्ये सत्ता गेली. त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत दोन गट दिसू निर्माण झाले. यातील एक गट राज ठाकरे यांना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी मानत असे तर दुसरा उद्धव ठाकरे यांना. परंतु, याच काळात स्मिता ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत होते. परंतु, पुढे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेतील वजन वाढत गेले आणि स्मिता यांचे नाव बाजूला पडले.
चित्रपट निर्मिती
स्मिता ठाकरे यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. हसिना मान जायेगी, हम जो कह ना पाये, सँडविच आणि सोसायटी काम से गई सारखे सिनेमांची निर्मिती स्मिता ठाकरे यांनी केली आहे.