RBI: यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे बॅंकिंग लायसन्स रद्द, आरबीआयचा निर्णय
Babaji Date Mahila Sahakari Bank: बँकेची आर्थिक परिस्थिती न सुधारल्याने अखेर 11 नोव्हेंबर रोजी आरबीआयनं बॅंकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ: भारतीय रिझर्व्ह बँकेने (The Reserve Bank of India- RBI) यवतमाळ जिल्ह्यातील बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेचे (Babaji Date Mahila Sahakari Bank Ltd, Yavatmal) बॅंकिंग लायसन्स रद्द केलं आहे. 11 नोव्हेंबरपासून बॅंकिंग व्यवहार बंद करण्याचे आरबीआयने या बँकेला आदेश दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बॅंकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती, त्यामुळे बॅंकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणले होते. आता आरबीआयने बँकिंग लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे कामकाज बंद झाल्यापासून, 8 नोव्हेंबर 2021 रोजी सहा महिन्यांकरीता निर्बंध लागू केले होते. मात्र मे महिन्यात देखील परिस्थिती न सुधारल्यानं 6 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती न सुधारल्याने अखेर 11 नोव्हेंबर रोजी आरबीआयनं बॅंकेचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला.
बँकेच्या 79 टक्के ठेवीदारांना त्यांचे सर्व पैसे परत मिळणार असल्याचं बॅंकेने आरबीआयला सुपूर्द केलेल्या अहवालात म्हंटलंय. डीआयसीजीसीकडून 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत 294 कोटी रुपये ठेवीदारांना परत केले आहेत.
आरबीआयने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे की, सध्याच्या स्थितीत बँक आपल्या सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात असमर्थ ठरेल. आणि अशा स्थितीत जर बँकेला व्यवहार करण्यास परवानगी दिली तर जनहितावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील.
आरबीआयने यासंबंधी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींच्या कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) प्राप्त करण्याचा अधिकार असेल. सुमारे 79 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळणार आहे. 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत, DICGC ने एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 294.64 कोटी रुपये आधीच दिले आहेत.
RBI ने महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधकांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्यासंबंधी आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्यासंबंधी विनंती केली आहे.
नऊ सहकारी बँकांना 12 लाखांचा दंड
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नं विविध बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल नऊ सहकारी बँकांना सुमारे 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयनं सोमवारी निवेदनाद्वारे ही माहिती दिली. निवेदनात आरबीआयनं सांगितलं की, देशभरातील नऊ बँकांवर 11.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचा (Osmanabad Janata Sahakari Bank) समावेश असून या बँकेला 2.5 लाख रुपये दंड ठोठावला आहे.