राजू शेट्टी म्हणजे महान व्यक्ती, ते राज्यातील 288 काय देशातील प्रत्येक विधानसभा लढवतील; रविकांत तुपकरांचा खोचक टोला
राजू शेट्टी म्हणजे महान व्यक्ती असून ते राज्यातील 288 काय तर देशातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक विधानसभा जागा लढवतील. त्यांची मोठी ताकद आहे. असं वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.
Buldhana News बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नासाठी आंदोलने व मोर्चे चालूच ठेवावेत, असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं होतं. खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो, असेही राजू शेट्टी म्हणाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी आता विधानसभेच्या अनुषंगाने पक्षाची मेट बांधू पाहत आहे. मात्र, असे असले तरी त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने त्यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे.
राजू शेट्टी म्हणजे महान व्यक्ती असून ते राज्यातील 288 काय तर देशातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक विधानसभा जागा लढवतील. त्यांची मोठी ताकद आहे. असं वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केले आहे. काल राजू शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही जागांवरील उमेदवार घोषित केले, यावर रविकांत तुपकर बोलत होते.
सरकारने शेतकर्यांना देशोधडीला लावले आहे
शेतकर्यांना देशोधडीला या राज्यातील सरकारने लावले आहे. राष्ट्रीयकृत बँकांना पाठीशी घालण्याचे काम हे सरकार करतंय. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पीककर्ज मिळत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यात फक्त 28 % पीककर्ज वाटप झालंय. तर बँका गोड बोलून शेतकऱ्यांकडून कर्ज भरून घेत आहेत, मात्र ज्यावेळी पेरणीची वेळ येते त्या वेळी पीककर्ज शेतकऱ्यांना देत नाही. यामुळे शेतकरी पेरणीच्या विवंचनेत आहे. यावेळी मुख्यमंत्री, अर्थमंत्री काय करत आहेत? असा सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा देखील मिळाला नाहीये. त्यामुळे मी कृषिमंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतलीय. त्यांनी आश्वासन दिलंय की आगामी काळात लवकर पीकविमा शेतकऱ्यांना मिळेल.तसेच तो मिळाला नाही तर मात्र आम्ही मुंबई स्थित पिकविम्याचे कार्यालय ठेवणार नाही. असा इशाराही रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.
शेतकरी पुत्राचे शहरातील विविध भागात लक्षवेधी आंदोलन
खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकाराकडे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शासन एकीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करतात. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात आणि त्यामुळेच तातडीने शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात यावे, यासाठी आज रुईवाई येतील शेतकरी पुत्र कुणाल जतकर यांनी शहरातील विविध भागात फलक घेऊन लक्षवेधी आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अनेक जण जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, बँकेवर मोर्चे काढतात. मात्र आजपर्यंत यातून प्रश्न सुटला नाही आणि त्यामुळेच सामान्य जनतेला आता शेतकऱ्यांची व्यथा माहित पडावी यासाठी फलक घेऊन चौका चौकात उभे राहून नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या