(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रश्मी शुक्लांना क्लीन चीट मिळाली, एकनाथ खडसेंचा गौप्यस्पोट
ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळाली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं.
Eknath Khadse : फोन टायपिंग प्रकरणातल्या (Phone Tapping Case) वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्पोट केला आहे. ज्या दिवशी रश्मी शुक्ला यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली त्याच दिवशी त्यांना क्लीन चीट मिळणार असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार अपेक्षेप्रमाणं रश्मी शुक्ला यांना क्लीन चीट मिळाली असल्याचे एकनाथ खडसे यांनी दिली आहे. त्यामुळं आता यावर फडणवीस काय बोलणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप
तब्बल 68 दिवस माझा फोन टॅप करण्यात आला. या प्रकरणात मुंबई पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. मात्र, फोन कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आलं हे कारण मला अद्यापही कळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच अंडरवर्ल्डच्या संदर्भात ज्यावेळी विधानसभेत प्रश्न मांडत होतो, त्यावेळी पाकिस्तान सौदी अरेबिया यासह इतर देशांमधून फोनवरुन तुम्हाला मारुन टाकू, संपवून टाकू अशा धमक्या देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली होती, तसेच स्वतः पोलिसांनी संरक्षण सुद्धा दिलं होतं असे खडसेंनी सांगितलं. मात्र, पोलिसांनी अचानक संरक्षण काढून घेतल्याचे खडसे म्हणाले.
ज्यांनी 50 खोके घेतली त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार ?
ज्यांनी 50 खोके घेतली आहेत त्यांचे पोलीस संरक्षण कधी काढणार ? असा सवालही खडसेंनी यावेळी उपस्थित केला. सरकारच्या विरोधात जो आंदोलन करतो त्याला कशा पद्धतीनं त्रास दिला जातो, तसेच ना उमेद केलं जात अशीच भूमिका नेहमी सरकारची राहिली असल्याचेही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जर रात्रभर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करुन झोपावं लागत असेल तर जनसामान्यांचे काय? असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित केला. पुढील काळात जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं
रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
जळगाव जिल्हा दूध संघातील अपहारासंबंधी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. मेलो तरी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करुन घेतला आहे. अर्ज दाखल करुन घेतला असला तरी गुन्ह्याची नोंद अद्यापही केली नाही. त्यामुळं गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी एकनाथ खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या: