राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली तेवढी हिंदूच होती, मराठीच होती; वडिलांना का नाही सांगितलं हिंदूना संपवतोय म्हणून? अविनाश जाधवांची नितेश राणेंवर बोचरी टीका
किती दिवस भांडी घासणार? पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? विचार न करता समोरची स्क्रीप्ट वाचतोय, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

Avinash Jadhav on Nitesh Rane: मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेवरून गरळ ओकणाऱ्यांना गर्भित इशारा दिला. महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाही तुमच्याशी, पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, अशा शब्दात सुनावले. त्यांच्या या भूमिकेनंतर मराठीचा मुद्दा हिंदू आणि धार्मिक वादाशी जोडण्याचा प्रयत्न मंत्री नितेश राणे यांनी केला. यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात राणे कुटुंबावर तोफ डागली आहे.
वडिलांना का नाही सांगितलं हिंदूचा खून करतोय म्हणून?
अविनाश जाधव म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कानडी होते का? तमिळ होते की ख्रिश्चन होते? ती सगळी कुटुंब हिंदू मराठी होते, सगळेच हिंदू होते. त्यावेळी वडिलांना का नाही सांगितलं हिंदूचा खून करतोय म्हणून? अशी विचारणा अविनाश जाधव यांनी केली. ते पुढे म्हणाले की, कोणाच्या सांगण्यावर बोलता, बोलताना एकदा तरी विचार करा आपण काय बोलत आहोत. किती दिवस भांडी घासणार? पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? विचार न करता समोरची स्क्रीप्ट वाचतोय, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी नितेश राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
मंत्री म्हणून मिरवणारे नितेश राणे काय करणार? ते पंखा हलवणार का?
नितेश राणे यांनी मीरा रोडच्या नया नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानले जात नाही. तिथल्या गोल टोपी वाल्यांच्या तोंडून मराठी कधी निघणार? अशी विचारणा केली होती. यानंतर संदीप देशपांडे यांनी सुद्धा पलटवार नितेश राणे यांना फटकारले होते. सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असेल तर मंत्री म्हणून मिरवणारे नितेश राणे काय करणार? ते पंखा हलवणार का? अशा शब्दात खिल्ली उडवली होती.
मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच
दरम्यान, राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये बोलताना म्हणाले की, त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून महाराष्ट्र सैनिक आनंद साजरा करत होते, तर एक आगाऊ मिठाईवाला म्हणाला की इथे तर हिंदीच चालणार, हे ऐकल्यावर महाराष्ट्र सैनिकांनी जे करायचं ते केलं. आता कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. त्या अमराठी मिठाईवाल्याने आगाऊपणा केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली. मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला,मोर्चा काढला. मोर्चा काढणाऱ्या कानाखाली मारली होती का? अजून नाही मारली. कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार, तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीत. किती काळ दुकानं बंद करून राहणार आहात? शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना? महाराष्ट्रात राहताय शांतपणे रहा, मराठी शिका, आमचं काही भांडण नाहीये तुमच्याशी. पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार.
इतर महत्वाच्या बातम्या
























