Ramdas Kadam : 'ज्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनीच हकालपट्टी केली', शिवसेनेतून वेगळं झाल्यावर रामदास कदम ढसाढसा रडले
Ramdas Kadam Exclusive Interview : शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. शिवसेनेतून वेगळं झाल्यावर रामदास कदम यांनी 'एबीपी माझा'सोबत खास बातचीत केली आहे.
Ramdas Kadam Exclusive Interview on Shivsena : गेल्या काही काळात महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. शिंदे गट विरुद्ध शिवसेना संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते रामदास कदम यांची शिवसेनेनं पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर हा वाद आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर 'एबीपी माझा'ने रामदास कदम यांच्यासोबत खास बातचीत केली आहे. यावेळी ज्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनीच हकालपट्टी केली, असं सांगताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले.
रामदास कदम यांनी सांगितलं आहे की, 'छगन भुजबळ फुटले तेव्हा मी संघर्ष केला. नारायण राणे फुटले तेव्ही मी संघर्ष केला. राज ठाकरे फुटले तेव्हा मी संघर्ष केला. हकालपट्टी करताना आमच्या संघर्षाची आठवण ठेवा. उद्धव साहेब तुम्ही हकालपट्टी केली नाही मी राजीनामा दिला. मी माझ्या मनातून तुम्हांला काढलंय. 52 वर्षे काम करणाऱ्या एका शिवसैनिकावरती राजीनामा देण्याची वेळ का येते याचं आपण आत्मपरिक्षण केलं पाहिजे.'
'एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो, त्यांनी शिवसेना वाचवली'
यावेळी रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, 'मी एकनाथ शिंदे आणि 51 आमदारांचे आभार मानतो त्यांनी शिवसेना वाचवली. आम्ही टाहो फोडून सांगत होतो. राष्ट्रवादीच्या आमदाराला ताकद देऊन शिवसेनेचा आमदार कसा संपवायचा हा कट पवार काका-पुतण्यांनी केलं. मागील अडीच वर्षात शिवसेना संपवण्याचं काम पवार काका-पुतण्यांनी केलं आणि त्यामध्ये ते काही अंशी यशस्वीही झाले.'
पाहा व्हिडीओ : रामदास कदमांना अश्रू अनावर
'उद्धव साहेब, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात'
रामदास कदम यांनी हकालपट्टीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'उद्धव साहेब आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. 51 आमदारांची हकालपट्टी केली. उद्या 12 खासदार जातील त्यांची हकालपट्टी कराल. शेकडो नगरसेवकाची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हांला केवळ हकालपट्टी करणं एवढंच काम राहिलं आहे का? ही परिस्थिती का आली याचं आत्मपरिक्षण करा', असं आवाहन रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना केलं आहे.