मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून महायुतील दोन नेत्यांमध्ये जुंपली; रामदास कदमांची मंत्री रवींद्र चव्हाणांवर घणाघाती टीका
महायुतीतील नेत्यांमधील वाद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून रामदास कदमांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केलंय.
Maharashtra Politics : महायुतीतील नेत्यांमधील वाद संपता संपत नसल्याचे चित्र आहे. अशातच आता मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून रामदास कदमांनी (Ramdas Kadam) थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना लक्ष्य केलं. त्यामुळे महायुतीतील (Mahayuti) वाद थेट मुद्यावरून गुद्यावर पोहोचलाय. अर्थात हे वाद काही नवीन नाहीत. या वादांची एक मालिकाच आहे. दरम्यान, यासाऱ्याचा परिणाम नेमका काय होणार? राज्यासह कोकणातील वातावरण कसं ढवळून निघणार? हे आगामी काळात बघणे महत्वाचे ठरणार आहे. तर आज रामदास कदमांनी एबीपी माझाशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हा वाद कुठवर जातो, हे ही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
रामदास कदमांच्या या विधानांमुळे महायुतीत वादाची ठिकणी पडलीय. अर्थात हि ठिणगी काही पहिल्यांदाच पडतेय असं नाही. सत्तेत असलेल्या महायुतीत मागील काही दिवसांपासून हे वारंवर घडतंय. त्यामुळे पहिला प्रश्न महायुतीत खरंच सारं आलबेल आहे का? असा निर्माण होतोय. कदमांच्या या विधानानंतर रवींद्र चव्हाण यांनी काही प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट रस्त्यावर समोरासमोर येण्याची भाषा केली. पण, त्यानंतर मात्र चव्हाणांनी युती धर्माचा दाखला देत अधिक भाष्य करणे टाळलंय.
महायुतीत खरंच सारं आलबेल आहे का?
अर्थात महायुतीतल वाद नवे नसले तरी, रामदास कदमांची वाद करण्याची हि काही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या मुद्यावरून, तर कधी विकास कामांच्या मुद्यावरून रामदास कदमांनी भाजपला लक्ष्य केलंय. यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा रामदास कदम यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. आपला मुलगा योगेश कदम यांच्या मतदारसंघात येऊन भाजपच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी परस्पर विरोधी काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी लगावला होता. लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून कोकणात शिंदेंच्या शिवसेनेला जागा न सोडल्यामुळे रामदास कदम यांनी थेट नाराजी व्यक्त करत भाजपावर जोरदार टीका केली होती.
मुंबई-गोवा हायवेच्या मुद्यावरून महायुतील दोन नेत्यांमध्ये जुंपली
प्रादेशिक पक्ष संपवून फक्त भाजपलाच मोठे व्हायचं आहे का? असा सवाल त्यांनी भाजपला केला होता. 2009 सालात गुहागरचे भाजपचे बंडखोर उमेदवार विनय नातू यांच्यामुळे झालेला पराभव रामदास कदम यांच्या आजही लक्षात आहे. तर त्यामुळेच रामदास कदम आणि विनय नातू यांच्यातला स्थानिक स्तरावरचा संघर्ष वारंवार पहायला मिळाला आहे. डॉक्टर विनय नातू यांना गुहागरमधून विधानसभेची सीट दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये विनय नातू यांना निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशारा रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संबंध राजकीय दृष्ट्या अजिबात चांगले नाहीत. तर स्थानिक पातळीवर कोकणात देखील रामदास कदम आणि दापोली भाजप यांच्यामधला संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वारंवार पहायला मिळालाय.
अनेक प्रश्नांची मालिका?
अर्थात महायुतीचे वाद वारंवार चव्हाट्यावर येत असल्याचं दिसून येतात. त्यामुळे काही गंभीर प्रश्न नक्कीच निर्माण होतात. या वादांमुळे महायुतीत खरंच सर्व काही आलबेल आहे का? लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा जास्त आल्या. पण, भाजपच्या कमी याचं शल्य कार्यकर्त्यांना आहे का? महायुतीतील वादाचा परिणाम मतदारांवर होणार का? महायुतीचे प्रमुख नेते सर्व काही आलबेल असल्याचं सांगतात. पण, नेत्यांमध्ये होणाऱ्या वादाचं काय? राज्याचा प्रत्येक कोपऱ्यात स्थानिक पातळीवर सुरू असलेलं राजकारण हे युतीतील मित्रपक्षांसाठी मारक आहेत का? त्यातून हे वाद निर्माण होत आहेत का? दुखवलेली मनं जवळ येतील का? विधानसभा निवडणुकीमध्ये मित्र पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांचं मनापासून काम करतील का? सध्या सुरू असलेले वाद विधानसभेपूर्वी थांबतील का? वादांमध्ये किंवा वाद वाढू नये यासाठी महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतले जाणार का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.
राजकारणातील वाद काही नवीन नाहीत. यापूर्वी देखील ते झालेले आहेत. पण, सध्या उघडपणे, वैयक्तिक पातळीवर होत असलेली टीका, त्यातून महायुतीची तयार होणारी प्रतिमा, याचा परिणाम राज्यातील जनतेवर नेमका कसा होतोय? हे येत्या काळात अधिकपणे स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा