मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरच्या केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत राजकीय नेत्यांसह अनेकांच्या निशाण्यावर आहे. मात्र कंगनाच्या पाठिशीही काहीजण उभे राहत आहेत. रिपाईचं अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगना रणौतला तिचे मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचाही अधिकार आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही. कंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.


अमृता फडणवीस यांनी देखील कंगनाची बाजू घेतली आहे. एखाद्याच्या म्हणण्याशी आपण सहमत नसू, मात्र लोकशाही व्यक्त होण्याचा, मत मांडण्याच्या अधिकाराचं आपण रक्षण केलं पाहिजे. भाषणाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य, पत्रकारितेचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्याच्या मताचा आपण प्रतिवाद करुन शकतो, मात्र टीकाकारांच्या पोस्टर्सना चप्पल मारणे खालच्या पातळीचे लक्षण आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी कंगना रणौतला पाठिंबा दर्शवला आहे.


कंगनाला मुंबईत राहण्याचा कोणताही अधिकार नाही : गृहमंत्री


"कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही."


काय आहे प्रकरण?


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.


याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.





संबंधित बातम्या