(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raju Shetti : मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला
सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याचा दर्जा रसातळाला गेला आहे. याची किळस आता सामान्य माणसालाही येत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
Raju Shetti : महाराष्ट्रातील सरकार नेमकं कशासाठी बनले, हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहला आहे. कारण सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याचा दर्जा रसातळाला गेला आहे. याची किळस आता सामान्य माणसालाही येत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government)केली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
सरकारचे अस्तित्व शून्य
गेल्या दोन महिन्यात राज्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी झाली आहे. जनावरांवर लम्पीसारखा आजार आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात जाऊन यंत्रणा कामाला लावण्याची जवाबदारी पालकमंत्र्यांची असते. मात्र, जिल्ह्यांना अजूनही पालकमंत्री मिळाले नाहीत. यामुळं या सरकारचे अस्तित्व शून्य झाले असल्याचे शेट्टी म्हणाले.
महाविकास आघाडीशी आम्ही एप्रिल महिन्यामध्येच संबंध संपवून टाकला आहे. पुन्हा त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी चळवळ उभी करणे हा आहे. तसेच राजकीय भूमिका आमची स्वतंत्रपणे राहील असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले. राजू शेट्टी हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर शिक्के मारले ते नादान निघाले
तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर शिक्के मारले ते नादान निघाले आहेत. ते काहीच करत नाहीत. सरकारच्या विरोधात काही जणांची बोलण्याची हिंमत नाही. त्यामुळं मला मैदानात उतराव लागत असल्याचे शेट्टी म्हणाले. एवढा मोठा पाऊस पडला, जमिनी वाहून गेल्या, शेती पिकं वाया गेली. तरी महसूल खात्यान घरात बसून पंचनामे केले. कृषी अधिकारी शिवारात फिरकले नाहीत याचा हा परिणाम आहे. त्यांना जाब विचारणार कोण. अजूनही जिल्ह्याला पालकमंत्री नाही. पालकमंत्रीच नाहीतर आढावा कोण घेणार? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झालं, पण ते फक्त दही हंडीच फोडत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. गणपतीच्या काळात घरा घरात जाऊन दर्शन घेत राहिले. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक असावं, उत्सव साजरा करावा, पण उत्सव साजरा करण्यापूर्वी महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेची आपल्यावर जबाबदारी आहे याचं भान ठेवलं पाहिजे असेही शेट्टी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: