एक्स्प्लोर
...तर हनुमान काय कामाचा?, राजू शेट्टींचा सदाभाऊंना खोचक टोला
मुंबई : सीता संकटात असताना हनुमान मदतीला धावून येत नसेल, तर तो हनुमान काय कामाचा?, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खोचक टोला लगावला आहे. खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वातील आत्मक्लेश यात्रा राजभवनावर धडकली. त्यानंतर राजू शेट्टी यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. सदाभाऊ काय म्हणाले होते? मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत गेलो आहे, तिथं मी शेतकऱ्यांचेच प्रश्न मार्गी लावतोय, असं कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
“या सोन्याच्या लंकेत रामाची सीता असेल, तर आपणच मागणी करत होतो तिथे हनुमानाला पाठवावं लागेल. तुम्ही बसलेले सगळे राम आहात, मी लहानसा हनुमान म्हणून सीतेच्या शोधाला गेलो आहे. यापेक्षा जास्त काम माझं नाही. तुमची सीता कुठं आहे हे दाखवण्याचं काम माझं आहे, तुमच्यासोबत लढण्याचं कामही माझं आहे”, असं सदाभाऊ म्हणाले.सरकारकडून कोणीही चर्चेसाठी येत नाही : शेट्टी कर्जमाफीच्या मागणीचे साडे सहा लाख शेतकऱ्यांच्या सहीचे फॉर्म राज्यपालांना दिले, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. शिवाय, चर्चेची दारं उघडी आहेत, मात्र सरकारकडून कोणीही चर्चेसाठी समोर येत नाही, असेही त्यांनी सांगितले. पवार समृद्धी महामार्गाविरोधात उतरणार, ही चांगली गोष्ट : शेट्टी "शरद पवार समृद्धी महामार्गाच्या विरोधात उतरणार ही चांगली गोष्ट आहे. समृद्धी महामार्ग हा मुर्खपणाचा कळस आहे. मात्र या आंदोलनात वेगवेगळे लढू.", असेही राजू शेट्टी म्हणाले. ...तर सरकारमध्ये राहायचं की नाही, याचा निर्णय घेऊ : शेट्टी "सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम देत आहोत. त्यानंतर आंदोलन उग्र होईल. कर्जमाफी झाली नाहीतर एका महिन्यानंतर कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय घेऊ.", असे म्हणत राजू शेट्टींनी सरकारला इशारा दिला आहे. संबंधित बातमी :
मी शेतकऱ्यांचा हनुमान म्हणून सरकारच्या लंकेत: सदाभाऊ
आणखी वाचा























