(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Lockdown : 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत
राज्यातील कोरोना रुग्णसंख्यावाढीचा वेग आणि मृत्यूचं प्रमाण पाहता प्रशासन घेणार महत्त्वाचा निर्णय़
Coronavirus Lockdown : कोरोना विषाणूचा देशात आणि राज्यात वाढणारा संसर्ग पाहता प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या काही अंशी अटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या याच प्रयत्नांच्या बळावर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख राज्यात उतरणीला लागला आहे. पण, असं असलं तरी अद्यापही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अतिशय सावधगिरीनं पावलं उचलण्यात येणार आहेत.
जवळपास महिन्याभरापासून सुरु असणारे लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार की त्यामध्ये काही बदल केले जाणार याबाबतचेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केले आहेत. ज्यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले.
कोरोना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या आणि मृतांचा आकडा कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये 1 जूननंतर लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले. निर्बंध शिथिल करण्यात येणार असले तरीही ते एकाच वेळी शिथिल होणार नाही. तर, टप्प्याटप्प्याने या नियमांमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. त्यामुळए राज्यातीन नागरिकांना दिलासा मिळण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय़ घेतले जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Satara Lockdown : साताऱ्यात 25 मेपासून 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन; निर्बंध आणखी कडक, काय सुरु, काय बंद?
मुख्यमंत्र्यांनीही दिले असेच संकेत
तोक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून काहीशी सूट मिळेल, असे संकेत दिले होते. लॉकडाऊनबद्दल सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. या निर्णयाला चारच दिवस झाले आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही. सध्याच्या लॉकडाऊनचे परिणाम काय होतात हे पाहून पुढील निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती पाहता लवकरच आढावा बैठक होईल. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संचारबंदीमध्ये सूट देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल."