रशिया, चीन आणि इंग्लंडहून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज; केंद्राने नियमावली करावी: राजेश टोपे
Corona : रशिया ,इंग्लड आणि चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाचा धोका आता काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचं दिसून येतंय. पण रशिया, चीन आणि इंग्लंड या देशांमध्ये कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.
देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना जगभरातील परिस्थितीवरही बारकाईने लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. रशिया ,इंग्लड आणि चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतराष्ट्रीय विमानतळ आणि या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच ICMR ने याबाबत नियमावली ठरवावी असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे चीनमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा प्रसार सर्वप्रथम चीनमध्ये झाला होता, त्यानंतर जगभराला त्याचा सामना करावा लागला होता. ब्रिटन आणि रशियामध्येही कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला होता. आता तिसऱ्या लाटेनेही तोंड वर काढलं असून या देशांमध्येही काही भागांत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिवाळी साजरी करताना नागरिकांनी कोरोनाचे भान ठेवावे, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करताना प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे.