Vijay Wadettiwar on Raj Thackeray : मागे लढले तेव्हा एक आला होता आता बघू; राज ठाकरेंच्या स्वबळावर काँग्रेस नेत्याची खोचक टीका!
Vijay Wadettiwar on Raj Thackeray : राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागांवर स्वतः निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीचा घटक नसतील हे आता स्पष्ट झालं आहे.
Vijay Wadettiwar on Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज स्वबळाचा नारा दिला. राज ठाकरे यांनी 225 ते 250 जागांवर स्वतः निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीचा घटक नसतील हे आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली.
मागे लढले तेव्हा एक आला होता, आता बघू
मनसेच्या स्वबळावरील निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर विचारण्यात आलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या विषयी मी काय बोलणार? ते कधी एका मंचावर असतात तर कधी दुसऱ्या मंचावर असतात. त्यांचे निर्णय आणि त्यावर आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मागे लढले तेव्हा एक आला होता, आता बघू अशा खोचक शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या स्वबळाची विजय वडेट्टीवार यांनी खिल्ली उडवली.
कोणी कितीही खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्र लढणार
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही काम केलं, त्याच पद्धतीने विधानसभेलाही करू अशी अशा व्यक्ती केली. कोणी कितीही खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एकत्र लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमचा जोर पुढील निवडणूक जिंकण्यासाठी असल्याचे ते म्हणाले, त्यांचा जोर हा पैशासाठी पैसे साठवण्याच्या दृष्टीने असल्याचा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की काँग्रेस विदर्भात मजबूत आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी शिवसेना मजबूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी असे चित्र आहे. आम्हाला विदर्भात अधिक जागा मिळावी अशी मागणी असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही कंपनीत 80 टक्के लोकांना घेतले जावे
मुंबईत असून महाराष्ट्रीयन नको, अशी जाहिरात देणाऱ्या कंपनीविरोधात चांगलाच संताप व्यक्त होत आहे. मनसेनं आज माफी मागायला भाग पाडले. याबाबत ते म्हणाले की, आर्या गोल्ड नावाची कंपनी आहे. सगळा रिसोर्सेस राज्यातील वापरून यांना महाराष्ट्रीयन नको हा गुन्हा आहे. शासनाचा नियम आहे की कोणत्या ही कंपनीत 80 टक्के तेथील लोकांना घेतले जावे. कायदा नसेल आणि नियम असेल तर हे मनात वाटेल तसे काम करतात. एकही माणूस त्या कंपनी बाहेरचा त्यात लगता कामा नये.महाराष्ट्रात एवढे टॅलेंट असताना हे होत आहे. सत्ता महाराष्ट्राची पण फायदा मात्र हिंदी भाषिकांचा, अशीही टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या