Raj Thackeray on Hindi: हिंदीविरोधी मोर्चाला कोण कोण येत नाही तेच बघतो, राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा; ना कोणता झेंडा, फक्त मराठीचाच अजेंडा!
Raj Thackeray on Hindi: या मोर्चासाठी इतर राजकीय पक्षांसोबत सुद्धा बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर उद्धव यांच्याशी बोलण्यासाठी आमची माणसं जातील असे राज यांनी नमूद केलं.

Raj Thackeray on Hindi: राज्यात सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मुंबईमध्ये कोणत्याही पक्षाच्या झेंड्याविना विराट मोर्चा काढण्याची जाहीर घोषणा केली. 6 जुलै रोजी सकाळी दहा वाजता विराट मोर्चा निघणार असून यामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर फक्त मराठी अजेंडा असेल अशी गर्जना राज यांनी आज शिवतीर्थवरून केली. या मोर्चा सर्व साहित्यिक, मराठी प्रेमी, सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावं, असे आवाहन त्यांनी केलं. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. मात्र या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी दादा भुसे यांनी केलेले दावे फेटाळून लावत कोणत्याही प्रकारची हिंदी सक्ती महाराष्ट्रामध्ये खपवून घेणार नसल्याचा जाहीर इशारा दिला.
महाराष्ट्रातून मराठी घालवण्याचा कट
भाषा सोडून इतर कोणतेही उपक्रम शाळेमध्ये शिकवा, पोहायला शिकवा, त्याला समर्थन असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी या मोर्चासाठी निर्णायक इशारा दिला आहे. या मोर्चासाठी इतर राजकीय पक्षांसोबत सुद्धा बोलणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्यासाठी आमची माणसं जातील असे राज ठाकरे यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातून मराठी घालवण्याचा कट असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला. आज आपण सर्वजण विरोध करत आहोत. मात्र, मला बघायचं आहे की या मोर्चामध्ये कोण कोण सामील होत आहे, कोण येणार आहे आणि कोण येणार नाही हे सुद्धा मला बघायचं असल्याचा सुद्धा राज ठाकरे यांनी सांगत एक प्रकारे निर्वाणीचा इशारा दिला. ही लढाई महाराष्ट्राची असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
दरम्यान, शिक्षक तुटवड्यावर सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की दहा हजार शिक्षकांची भरती करणार आहेत, असे सांगत आहेत. मात्र, पगार देण्यासाठी पैसे आहेत का? अशी विचारणा सुद्धा राज ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रामधून मराठी हद्दपार करण्यात येत आहे का? अशी शंका सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. जेएनपीटीला रिक्त पद आहेत आणि मुलाखती अदानी पोर्टवर होत आहेत, महाराष्ट्रात काय सुरु आहे हेच कळत नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात इतके प्रश्न असतांना केवळ आपण भाषेवर का येत आहोत? कोणती मोठी गोष्ट लपवण्यासाठी हे सुरु आहे का? अशी विचारणाही राज यांनी केली. दादा भुसें यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा विषय नाही हे मान्य केलं, तरी राज्याचा तिसऱ्या भाषेसाठी आग्रह असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























