Monsoon Update : मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची हजेरी; चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा, विदर्भाची प्रतिक्षा कायम
Weather Forecast : मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसानं हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे काही भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला असून विदर्भाची प्रतिक्षा कायम आहे
Monsoon Update : मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) तसेच राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर (Palghar) परिसरात पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस (Rain Update) पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातही मंगळवारपासून पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे मुंबई आणि ठाण्यातील तापमान घटलं आहे. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. राज्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची हजेरी
बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारताच्या किनापट्टी भागातील हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. सोसाट्याचा वारा आणि रिमझिम पाऊस असं येथील चित्र आहे. मुंबईकर सध्या पहिल्या पावसाचा आनंद घेत आहेत. चक्रीवादळामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. ठाण्यात मंगळवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत पावसानं जोर धरला होता. आता रिमझिम पाऊस बरसत आहे.
नागरिकांची उकाड्यापासून सुटका
पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. डहाणू, तलासरी परिसरात सकाळीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील काही भागात पाऊस पाहायला मिळत आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा कोसबाड कृषी हवामान केंद्राचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
वसई विरारमध्येही रिमझिम पाऊस
वसई विरारमध्ये रात्रभर रिमझिम पाऊस सुरू आहे. आज सकाळी पूर्ण परिसरात ढगाळ वातावरण असून अधून-मधून रिमझिम पाऊस पडत आहे. महापालिकेच्यावतीने पावसाळ्या पूर्वीच्या झाडांच्या फांद्या छाटने गरजेचे होतं, त्या छाटल्या नसल्यामुळे कालपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. विरार पूर्व, विवा जहांगीड परिसरातील ऋषी विहार समोर झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत. यात कोणतेही नुकसान झाले नाही
13/06, latest satellite obs at 8.45 am, Monsoon clouds over #Kerala and South #Karnataka coasts observed.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 13, 2023
Isolated cloud formation also seen over #Konkan region. pic.twitter.com/s4WE4Tx5u6
तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
केरळ आणि दक्षिण कर्नाटक किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून आले आहेत. कोकण किनारपट्टीवरही ढग दाटून आले असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामान बदललं असून पावसाची रिपरिप सुरु आहे. तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात गडगडटासह पावसानं हजेरी लावली आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली तालुक्यातही रिमझिम पाऊस सुरु आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून उष्णेतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.