अरबी समुद्रातील 'त्या' संशयास्पद बोटीबाबतची महत्त्वाची माहिती समोर; पाकिस्तान कनेक्शन नसल्याचा दावा
Raigad Suspected Boat : रायगडच्या किनाऱ्यजवळ आढळलेल्या संशयास्पद बोटींचे पाकिस्तान कनेक्शन नसल्याची माहिती समोर आली आहे.
Raigad Suspected Boat: अरबी समुद्रात आढळलेल्या संशयास्पद बोटीबाबत (Raigad Suspected Boat) आता नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून 44 नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने (Coast Guard) पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत, हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. आधी हाती आलेल्या माहितीनुसार, या बोटीत पाकिस्तानी नागरीक असल्याची माहिती होती. मात्र, त्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.
'जलराणी' ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.
आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती. मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही असेही कोलासो यांनी स्पष्ट सांगितले.
सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला आहे. या बोटीने उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असं कोलासो यांनी सांगितलं.
ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घ्यायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील असे ही लिओ कोलासो यांनी सांगितले.
प्रकरण काय?
आज सकाळच्या सुमारास एक संशयास्पद बोट आढळली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत होते. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ही बोट नौदलाच्या हद्दीत आढळली. त्यामुळे नौदलाकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या बोटीत पाकिस्तानी नागरीक असल्याची माहिती समोर आल्याने अनेक तर्क लढवले जात होते.
मागील वर्षी संशयास्पद बोटीने खळबळ
मागील वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्या होत्या. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आले होते. मात्र, या बोटीबाबत तपासाअंती मिळालेल्या माहितीमुळे सुटके नि:श्वास सोडण्यात आला होता.
ही बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच एका जहाजाने सुटका केली. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती देण्यात आली.
सागरी सुरक्षेतील तीन स्तर
सागरी सुरक्षा व्यवस्थेत तीन स्तर समजले जातात. यामध्ये राज्य सागरी पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल असे तीन स्तर असतात. या तिन्ही यंत्रणांची स्वत: ची हद्द असते. राज्य सागरी पोलीस किनाऱ्यापासून 22 किमी पर्यंतच्या हद्दीत काम करतात. तर, तटरक्षक दल हे 22 किमी ते 370 किमीपर्यंत काम करतात. नौदलाची मुख्य जबाबदारी ही 370 किमीपासून ते सागरी सीमेपर्यंत असते.