Rahul Narwekar: लवकरच क्रांतीकारक निर्णय घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Political Crisis: मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं आहे.
Rahul Narwekar on Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं असताना त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलं आहे. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकर यांनी सूचित केलं आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं.
राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, "1977 साली माझा जन्म झाला आणि याच साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतीकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यावर घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन."
पाहा व्हिडीओ : मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेऊन : राहुल नार्वेकर
दरम्यान, स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाच्या कोर्टाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रकरणावर दिलेले हे अप्रत्यक्ष संकेत आहे. राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आणि राज्यात राजकीय सत्तासंघर्ष उद्भवला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काही दिवसांपूर्वी निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत दिलेल्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे आता शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेले ते आमदार पात्र की, अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे तर आहेच, मात्र कोणाचा गट हा खरा पक्ष आहे? हे ठरवण्याचे अधिकार देखील राहुल नार्वेकर यांच्याकडेच आहेत, असं राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. अशातच आता राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णयाबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आता नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.