Pune Sasoon Hospital News : 'एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतोय'; ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगत ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल आल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. ससूनमधील सुरू असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश देणारा हा फोन होता.
Pune Sasoon News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असे सांगत पुण्यातील (Sasoon Hospital) ससून हॉस्पिटलच्या डीन यांना फेक कॉल आल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला आहे. ससूनमध्ये सुरु असलेल्या मेसचे दुसरे टेंडर भरा, असा आदेश देणारा हा फोन होता. या फोननंतर काही वेळासाठी ससून रुग्णालयात खळबळ उडाली होती. ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना लॅन्डलाईनवर हा फोन आला होता.
फोनबाबत शंका आल्याने डीन संजय ठाकूर यांचा थेट सीएमओला कॉल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पी. ए. बोलतो आहे, असं सांगून फोन करणारा तब्बल पाच मिनिटे बोलत होता. त्या व्यक्तीने डीन यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि डीन यांना अनेक सूचनाही केल्या. मात्र काही वेळानंतर डीन संजीव ठाकूर यांना फोनबाबत संशय आला. त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकाराची खात्री करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन केला. त्यानंतर त्यांना आलेला फोन फेक असल्याचं उघड झालं. या घटनेची माहिती अद्याप पोलिसांनी देण्याक आलेली नाही.
पुण्यात फेक कॉलचे प्रकार वाढले
मागील काही दिवसांपासून निनावी फोन किंवा फोन करुन धमकवल्याचे प्रकार पुण्यात सातत्याने बघायला मिळत आहेत. स्नूफिंग सारखे प्रकारही काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर ससून हॉस्पिटलमधील डीन यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमधून आलेल्या फोनने सगळीकडे काही वेळ खळबळ उडाली होती. फोन करुन त्या व्यक्तीने मग ससूनच्या आवारातील दोन कँटीन तातडीने बंद करण्याची आदेशवजा सूचना दिली.
पोलिसांकडे फेक कॉलबाबत तक्रार नाही
फोन येण्याच्या काही तासांपूर्वीच ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी संध्याकाळी कँटीन समितीची बैठक घेतली होती. चार कँटीनच्या निविदेची मुदत संपल्याने ती बंद करणार असल्याबाबत त्यात चर्चा झाली होती. त्यानंतर फेक कॉलमध्ये याच विषयावर चर्चा झाली आणि काही वेळातच डॉ. संजीव ठाकूर यांनी हा हुशारीने हा सगळा प्रकार उघड केला. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची माहिती त्यांनी पोलिसांना दिली नाही आणि या सगळ्या फेक प्रकरणात वेळ वाया न घालवता त्यापेक्षा रुग्णांवर वेळेत उपचार करणं आणि नियोजित शस्त्रक्रिया जास्त महत्त्वाच्या आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे अजूनही पोलिसांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही.