Pune News: डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता दोन महिने वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग
Bhide Bridge : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एलिव्हेटेड वॉकवे बांधण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मुठा नदीवरील भिडे पूल आणि डेक्कन पीएमपीएमएल बस स्टॉप यांना जोडणारा रस्ता दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे.
Pune News: पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एलिव्हेटेड वॉकवे (Pune metro) बांधण्यासाठी पुणे शहर (Pune Traffic) वाहतूक पोलिसांनी मुठा नदीवरील भिडे पूल ( baba bhide bridge) आणि डेक्कन पीएमपीएमएल (Deccan PMPML) बस स्टॉप (Bus Stop) यांना जोडणारा रस्ता दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. जंगली महाराज रोड ते पेठ भागातील प्रवाशांसाठी मुख्य वाहतूक मार्ग बंद असणार आहे. हा रस्ता 14 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
डेक्कन पीएमपीएमएल बस स्टॉपवरून प्रवाशांना गरवारे पूल, खंडोजी बाबा चौक आणि केळकर रोड मार्गाने जाता येणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरून भिडे पुलाकडे जाणारी वाहनेही काकासाहेब गाडगीळ पुलावरून जाऊ शकतात. भिडे पुलावरून जंगली महाराज रोडकडे जाणारी वाहने पुलावरून उजवीकडे जाऊन हॉटेल सुकांतासमोरील रस्त्याने जाऊ शकतात, असे वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.
डेक्कन परिसरात मेट्रोचं काम सुरु आहे. या कामासाठी हा पुणेकरांसाठी महत्वाचा असलेला रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता डेक्कन परिसरातून पेठांमध्ये जाण्यासाठी वळसा घालावा लागणार आहे. जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्त्यावर अनेकदा मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पुणेकर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र दोन महिने पुणेकरांना हा रस्ता वापरण्यास मनाई केली आहे.
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं काम वेगाने सुरु आहे. याच मार्गावरील डेक्कन जिमखान्याचं मेट्रो स्टेशनचं काम सुरु आहे, त्यासोबतच पादचारी पुलाचं तसेच तिथं जाण्यासाठीच्या जोड रस्त्याचं काम सुरू झालं आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने पुणेकरांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे.
असे असतील पर्यायी मार्ग
- डेक्कन येथून भिडे पूलमार्गे नारायण पेठेत येणार्या वाहनचालकांनी लकडी पुलाचा वापर करावा.
- जर तुम्ही जंगली महाराज रस्ता किंवा आपटे रस्त्याने डेक्कन बसस्टॉप लगत असलेल्या रस्त्याने भिडे पुलावरून जाऊ इच्छित असल्यास हा मार्ग उपलब्ध नसेल.
- खंडोजी बाबा चौकातून डावीकडेवळून टिळक चौकापासून केळकर रस्त्याचा वापर करावा.
- दुचाकीने प्रवास करण्यासाठी झेड ब्रिजचा (Z Bridge) वापर सुरू राहिल.
- नारायण पेठेतून भिडे पुलावरून येणाऱ्यांनी पूल संपल्यानंतर सुकांता हॉटेल समोरील रस्त्याने जंगली महाराज रस्त्याकडे जाता येईल.