Pune Bhide Wada : पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; बाबा आढावांची मागणी
पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पुण्यात उपोषण केलं जात आहे. जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या उपस्थितीत हे उपोषण केलं जात आहे.
Pune Bhide wada : पुण्यातील भिडे (pune) वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा (bhide wada) दर्जा द्यावा या मागणीसाठी पुण्यात उपोषण केलं जात आहे. जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव (baba adhav) यांच्या उपस्थितीत हे उपोषण केलं जात आहे. सावित्रीच्या लेकी या संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. भिडे वाड्याची दुरवस्ता झाली आहे. ज्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटली त्याच वाड्यात आता उभं राहणंदेखील कठीण झालं आहे, त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा आणि त्याचा विकास करावा अशी मागणी बाबा आढाव यांनी केली आहे.
पुण्यातील भिडे वाडा शेवटच्या घटका मोजत आहे. काही दिवसांपूर्वी या वाड्यात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यादेखील आढळल्या होत्या. शिवाय पुण्यातील गजबजलेल्या ठिकाणी असूनही मागील अनेक वर्षांपासून या वाड्याकडे पालिका आणि राज्य सरकारनेही दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. या वाड्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. मात्र तरीही प्रशासन याकडे गांर्भीर्याने लक्ष देत नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. या सर्वांच्या विरोधात सावित्रीच्या लेकी एकत्र आल्या आहेत. त्यांनी भिडेवाड्यासमोर उपोषण करायला सुरुवात केली आहे.
या आंदोलनात अनेक सावित्रीच्या लेकी सहभागी झाल्या आहेत. शाहू, फुले, आंबेडकरप्रेमींनी या आंंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन बाबा आढावांनी केलं आहे. या वाड्याच्या दुरुस्तीसाठी आणि स्मारकाचा दर्जा मिळवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पुणे येथील भिडे वाड्याची परिस्थिती बिकट झाली आहे. या पूर्वीदेखील अनेक संस्थांनी अनेकदा मोठ मोठी आंदोलनं केली होती. लोकप्रतिनिधींनी अनेकदा या वाड्याची पाहणीदेखील केली होती. विधीमंडळातही त्यांनी आवाज उठवला होता मात्र तरीही सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचं सातत्याने समोर आलं आहे. भिडे वाड्याचा इतिहास जपला जावा आणि राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
छगन भुजबळांचीदेखील मागणी
शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्या अशी मागणी करत छगन भुजबळ यांनी आज नियम 97 अन्वये सूचना मांडली. यावेळी भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम 97 अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.