Pune Ganeshotsav 2023 : कुठे राम मंदिर तर कुठे शेगावचं गजानन मंदिर; प्रसिद्ध मंदिरांच्या कलाकृतीमध्ये विराजमान होणार पुण्यातील बाप्पा
यंदा पुण्यात विविध मंडळाचे गणपती देशातील प्रसिद्ध मंदिरात विराजमान होणार आहेत. यात प्रामुख्याने अयोध्यामधील राममंदिर, शेगावचे गजानन मंदिर, यांसह अनेक विविध देखावे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सादर केले जाणार आहेत.
पुणे : सार्वजनिक उत्सवांना सर्वप्रथम पुण्यात सुरूवात झाली (Ganeshotsav 2023)आणि त्यानंतर तो देशभर पसरला. अगदी पहिल्या वर्षापासून पुण्यातील गणपतीचे सर्वांना आकर्षण असते. यंदा पुण्यात विविध मंडळाचे गणपती देशातील प्रसिद्ध मंदिरात विराजमान होणार आहेत. यात प्रामुख्याने अयोध्यामधील राममंदिर, शेगावचे गजानन मंदिर, उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, चारधाम, पशुपतीनाथ मंदिर, यांसह अनेक विविध देखावे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सादर केले जाणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ गणपती
संपूर्ण जगभर हा गणपती प्रसिद्ध आहे. दरवर्षी दगडूशेठ गणपतीकडून वेगवेगळ्या मंदिरांच्या महालांचे देखावे सादर करतात. यावर्षी अयोध्येतील राममंदिर हा देखावा दगडूशेठ गणपती मंडळाने उभारला आहे.
भाजी मंडईचे शारदा गणपती मित्र मंडळ
अखिल महात्मा फुले भाजी मंडईचे शारदा गणपती मित्र मंडळ हे देखील पुण्यातील सुप्रसिद्ध गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते हा गणपती पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाजी मंडई येथे असून गणेश आणि शारदाची अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला यंदा गुरु दरबारमध्ये विराजमान झालेली पाहण्यास मिळणार आहे.
हुतात्मा बाबू गेनू मंडळ
हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखावा देखील नेहमी लक्षवेधी असतो. यावर्षी या मंडळाने देशातील चारधाम हा देखावा तयार केला आहे. या मंडळाचे देखावे काही वर्षांपासून कला दिग्दर्शक कै. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उभारले जायचे. काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. मात्र यंदाचा चारधाम स्थळांचा देखावा कसा असेल याचे नियोजन त्यांनी केलं होतं.
भाऊ रंगारी गणेश मंडळ
देशातील जुन्या सार्वजनिक गणेशमंडळांमध्ये याची ओळख आहे. या मंडळानं यंदा मंदिराचा देखावा तयार केलेला आहे. याचबरोबर क्रांतिकारकांचे माहेरघर असलेले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन देखील पाहण्यासारखे आहेत.
साने गुरुजी मंडळ पुणे
यंदाच्या वर्षी साने गुरुजी तरूण मंडळ प्रती उज्जैन महाकल मंदीराची प्रतिकृती साकारणार आहे.पुण्यनगरीत पहिल्यांदाच उज्जैन महाकाल आवतरणार आहे. गणेशभक्तांना पुण्यात म्हणजेचं साने गुरुजी तरूण मंडळात यंदा उज्जैन महाकल दर्शन घडणार आहे.
अखिल शनिपार मंडळ
दर गणेशउत्सवात काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अशी ओळख असलेले शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले अखिल शनिपार मंडळ, या मंडळाने यंदाच्या वर्षी नेपाळ मधील पशुपती नाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे.
राजाराम मित्र मंडळ
या मंदिराची खासियत आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती, याच बरोबर देशातील भव्य दिव्य मंदिराच्या प्रतिकृती उभारणे, यंदाच्या वर्षी ह्या मंडळाने शेगाव स्थित असलेले श्री गजाजन महाराज मंदिर उभारलंय. गणेशभक्तांना पुण्यात म्हणजेच राजाराम तरूण मंडळात यंदा गजानन महाराजयांचे दर्शन घडणार आहे.