Pune Bypoll election : पुणे पोटनिवडणुकीत आता थेट राहुल गांधींची उडी; बाळासाहेब दाभेकरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केला फोन
पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता राहुल गांधींनीदेखील या निवडणुकीत लक्ष घातल्याचं समोर आलं आहे.
Pune Bypoll election : पुण्याच्या पोटनिवडणुकीसाठी (Pune ByPoll Election ) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता राहुल गांधींनीदेखील (Balasaheb dabhekar) या निवडणुकीत लक्ष घातल्याचं समोर आलं आहे. आधी भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले तर आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे.
कसब्यातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा होती. त्यात रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर कॉंग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. काहीही झालं तरी मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही. पक्षाने माझा विचार केला नाही मी पक्षाचा विचार का करु?, अशी ठाम भूमिका बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली होती. त्यानंतर अचानक आज दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला किंवा कोणामुळे घेतला अशा चर्चा रंगल्या होत्या. या सगळ्या चर्चेला दाभेकरांनीच पूर्णविराम दिला आहे.
दाभेकर म्हणाले, मी उमेदवारी अर्ज मागे घेणारच नव्हतो. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माझ्या घरी येऊन मला उमेदवारी अर्ज मागे घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पुण्याचे स्थानिक नेतेदेखील माझी भेट घेऊन गेले होते. मी कॉंग्रेसचं 40 वर्ष काम केलं आहे. मला संधी दिली नाही त्यामुळे नाराज होतो. मात्र त्यातच मला थेट राहुल गांधी यांचा फोन आला आणि त्यांच्या फोनमुळे मी उमेदवारी अर्ज मागे घेऊन आता कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करणार आहे.
राहुल गांधी फोनवर काय म्हणाले?
पक्ष मोठा करण्यासाठी आपण भारतभर भारत जोडो यात्रा काढली होती. आपल्याला पक्ष मोठा करायचा आहे. कॉंग्रेस म्हणून एकत्र लढायचं आहे. त्यामुळे तुमची यासाठी साथ गरजेची आहे. तुम्ही कॉंग्रेसचं अनेक वर्षांपासून काम केलं आहे. आता पक्षासाठी आणि माझ्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशी विनंती राहुल गांधी यांनी दाभेकरांना फोनवरुन केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे दाभेकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. मी कॉंग्रेसचं मागील अनेक वर्षांपासून काम करतोय. अर्ज मागे घेतला आहे आणि कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारातदेखील सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.