YouTubeवर 'कामवाली बाई'ची हवा... सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओंच्या यादीत पुण्यातील अपर्णा तांदळे सुपरहिट
Aparna Tandale: यूट्यूबनं जाहीर केलेल्या 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अशा शॉर्ट्स व्हिडीओंच्या यादीत कामवाली बाईच्या 'बारिश में भीगना' या व्हिडीओला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे.
मुंबई: यूट्यूबवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या व्हिडीओंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये टॉप क्रिएटर्सच्या (YouTube Top Creaters List) यादीत कामवाली बाई (Kaamwali Bai Sheela Didi YouTube) हे कॅरेक्टर असलेले शॉर्ट ब्रेक्स (Shorts Break Channel) चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. तब्बल 30 कोटी लोकांनी पाहिलेला अपर्णा तांदळेच्या कामवाली बाईचा 'बारिश में भीगना' हा व्हिडीओ पहिल्या क्रमांकावर आहे. अपर्णा तांदळे ही पुण्याची असून ती सध्या यूट्यूबसह सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
Kaamwali Bai Sheela Didi: सोशल मीडियावर 'कामवाली बाई'ची हवा...
सध्या इंस्टाग्राम, फेसबूक अशा सोशल मीडियावर शीला दीदी या 'कामवाली बाई'ची भूमिका करणाऱ्या अपर्णा तांदळेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर मिलियन्स व्ह्युज आणि लाखोंच्या संख्येने लाईक्स असतात. त्यामुळे अपर्णा तांदळे हे नाव सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे. SHORTS BREAK या यूटयूब चॅनेलवर अपर्णा ही शीला दीदीच्या रुपात आणि तिचे मित्र सायली सोनुले आणि प्रशांत कुलकर्णी मालकाच्या रुपात अनेक वेगवेगळे मजेदार व्हिडीओ करत असतात. सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असे हे व्हिडीओ प्रेषकांच्या चांगल्याच पसंतीस उतरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अपर्णा तांदळे हिचं वय केवळ 22 वर्षे आहे, आणि इतक्या कमी वयात तिने हे यश संपादन केलं आहे.
Aparna Tandale Success Story: कोण आहे अपर्णा तांदळे?
अपर्णा तांदळे ही मूळची पुण्यातील हडपसरमधील आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अपर्णाचा तीन बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. अपर्णाला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून नाटकांमध्ये काम केलं. तिचं शालेय शिक्षण पुण्यातील कॅम्प एज्युकेशन कन्या शाळेत झालं असून तर महाविद्यालयाचं शिक्षण हुजूरपागा महाविद्यालय आणि गरवारे कॉलेजमधून पूर्ण झालं आहे.
अपर्णाला अभिनेत्री व्हायचं होतं, त्यामुळे त्या दिशेने तिने पाऊल टाकलं आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. नंतरच्या काळात शॉर्ट्स ब्रेक या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तिने 'कामवाली बाई' शीला दीदीचे व्हिडीओ बनवायला सुरू केले. अपर्णाच्या भन्नाट कल्पनेतून आलेले हे व्हिडीओ सध्या यूट्यूबवर धुमाकूळ घालताना दिसतायत. कामवाली बाईने अपर्णाला घराघरात पोहचवलं.
Aparna Tandale: खऱ्या आयुष्यात अपर्णा दिसतेय ग्लॅमरस
कामवाली बाईमध्ये नेहमी हिरव्या साडीत दिसणारी अपर्णा खऱ्या आयुष्यात मात्र ग्लॅमरस दिसतेय. तिचे कुरळे केस आणि आकर्षक चेहऱ्यामुळे ती कुणाच्याही नजरेत भरते. याला अपर्णाच्या अभिनयाची जोड मिळाल्यानेच आज अपर्णा सोशल मीडियावर स्टार आहे, आणि आतातर यूट्यूबनेही त्यावर शिक्कामोर्तब केलंय.
यूट्यूबनं जाहीर केलेल्या 2022 मधील भारतातील टॉप 20 CREATERSच्या यादीत पहिल्या क्रमांकावर SHORTS BREAK या चॅनेलला पसंती मिळाली आहे. तर शॉर्ट्स व्हिडीओमध्ये टॉप 10 शॉर्ट्स व्हिडीओच्या यादीत कामवाली बाईच्या 'बारिश में भीगना' या व्हिडीओला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. ही यादी यूट्यूबकडून (YOUTUBE OFFICIAL) जाहीर करण्यात आली आहे.