Prithviraj Chavan : खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणुकीस पुढे येत नाहीत; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती.

Prithviraj Chavan : महाराष्ट्रात खंडणीखोरांना राजाश्रय मिळत असल्याने (political protection extortionists) राज्यात सहा जिल्हे वगळता अन्यत्र उद्योजक गुंतवणूक (Maharashtra investment crisis) करण्यास पुढे येत नाहीत. याचा परिणाम बेरोजगारीवर होत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य हे खंडणीखोरांचे राज्य झालं आहे आणि त्याला राजाश्रय मिळत असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाण म्हणाले की, एकही मोठा उद्योग (entrepreneurs avoiding Maharashtra) महाराष्ट्रामध्ये येत नाही. उद्योगात एक नंबरवर असलेलं राज्य आज त्या नंबरवर राहिलेलं नाही. त्यामुळे उच्च दर्जाची गुंतवणूक होत नाही आणि त्याने रोजगार मिळत नाही. यावर राज्य सरकारने मुख्यमंत्री कार्यालयात खंडणीखोरांविरूध्द कक्ष स्थापन करून याला पायबंद घातला पाहिजे.
जातीनिहाय जनगणनेचं स्वागत
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे. याची सुरूवात 2011 मध्ये मनमोहन सिंग सरकारने केली होती. त्याची आकडेवारीही उपलब्ध झाली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे ती जाहीर करता आली नाही. यामुळे जातनिहाय जनगणना करण्यास काँग्रेसचा विरोध आहे असा आरोप चुकीचा असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि रायगड वगळता अन्य जिल्ह्यात नवे उद्योग उभा राहात नाहीत. याला कारण खंडणीखोरी आहे. खंडणीखोरीला राजाश्रय मिळत असल्याने ही प्रवृत्ती फोफावली आहे. विकसित सहा जिल्ह्यातच राज्याचे 75 टक्के उत्पन्न मिळते, मात्र, अन्य जिल्ह्यांचा विचार व्हायला हवा, यासाठी खंडणीखोरीला आळा बसला पाहिजे. केवळ रस्ते बांधकाम केले तर प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. समृध्दी येणे महत्वाचे आहे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्य आता अकराव्या नंबरवर पोहचले आहे. राज्य सरकार अडचणीत असून सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षात अंतर्गत बेबनाव आहे.
आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहोत
लाडकी बहीण या योजनेतून सरकारने पैशाची उधळपट्टी सुरू केली आणि त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सरकार अडचणीत आले, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला असून याचा फटका जनतेला बसत आहे. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला हा निंदनीय आहे. याविरूध्द कारवाई करण्यास सर्वच विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आहे. अतिरेकी प्रवृत्तीचा बिमोड करायलाच हवा, यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष सरकारच्या भूमिकेचे समर्थन करत आहोत, असे ते म्हणाले.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी व्यापार युध्द सुरू केले आहे. याचे गंभीर परिणाम सर्वच देशावर होणार आहेत. अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र शासनाने करार करत असताना केवळ वाणिज्य मंत्रालयाच्यामार्फत करार न करता कृषी व उद्योग विभागाचाही विचार करायला हवा. जागतिक व्यापार संघटनेचा भारत संस्थापक सदस्य आहे. मात्र ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे या संघटनेचे अस्तित्वच धोक्यात आले असून अमेरिकेशी व्यापार करार करत असताना सरकारने विरोधकांनाही विश्वासात घेण्याची गरज आहे. जे करार होणार आहेत, त्याचा कृषी व लघू उद्योगावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























