Prakash Ambedkar : मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर बोलायला नाही; प्रकाश आंबेडकरांची टीका
Prakash Ambedkar on PM Modi : मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण देशातल्या मणिपूरमधील हत्याकांडावर बोलायला वेळ नाही, अशी टीका ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलीय.
मुंबई : पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण देशातल्या मणिपूरमधील (Manipur) आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली आहे. भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असे सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.
भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का? - ॲड. प्रकाश आंबेडकर
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ला इतरा भयंकर होता की, या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अमेरिकेतील बटलर, पेनसिलव्हेनिया येथे रविवारी 14 जुलै रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला. मात्र, मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे. किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर येथे पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
गोळीबार होताच काय घडलं?
ट्रम्प स्टेजवर भाषण देत असताना take a look at what Happens म्हणत असतानाच चिक चिक करत गोळीबाराचे आवाज आले. तेव्हा एकच आक्रोश निर्माण झाला. ट्रम्प यांच्या दिशेने गोळी येताच त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागावरून घासून गेली. यानंत एका क्षणात ट्रम्प खाली बसले. तेव्हाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रिंगण करत बाजूला केले. तेव्हा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता. अवघ्या 12 सेकंदामध्ये हा प्रकार घडला.
या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी सांगितले की ट्रम्प यांना सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. AR-15 रायफलमधून 8 राउंड फायर करण्यात आले. पहिल्या फेरीत 3 तर दुसऱ्या फेरीत 5 गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, संशयित शूटर मारला गेला आहे. त्याचे वय 20 वर्षे होते. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या