सांगा विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीजपुरवठा खंडित
मराठवाड्यातील 1254 शाळांकडे 3.47 कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल करणे बाकी असल्याचं कारण सांगून या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज बिल न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 5 हजार 279 शाळा आहेत. या शाळांकडे एकूण 9.82 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर यातील 1254 शाळांकडे 3.47 कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल करणे बाकी असल्याने या शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
या शाळांपैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या औरंगाबाद परिमंडळात 409 शाळा आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळात 485 शाळा आहेत. तर हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नांदेड झोनमध्ये 360 शाळांचा समावेश आहेत.
एकीकडे कोरोनामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून शाळा बंद आहेत. आता या शाळा सुरू झाल्यानंतर राज्याच्या वीज मंडळाने 1254 शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शाळा सुरु झाल्या तरी मराठवाड्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या शाळांतील मुलं कशा पद्धतीने शिक्षण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने हा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यताही आहे.
महत्त्वाच्या बातम्या :