Eknath Shinde: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार? पक्षातील नेत्यांची मनधरणी, काळजीवाहू मुख्यमंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंकडे पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर ते देखील तुम्ही घ्यावे अशी मागणी केली आहे.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना मिळणार असल्याचं बोललं जातं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत अशा चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर ते देखील तुम्ही घ्यावे अशी मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार?
त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का अशा चर्चा आहेत. पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेच्या बाहेर न राहता सत्तेत राहून सरकार चालवावे, शिवसेना नेत्यांचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आवाहन केलं आहे. तसेच जर उपमुख्यमंत्री पद देण्यात आले, तर ते देखील तुम्ही घ्यावे अशीही मागणी केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा देखील मागणीला सकारात्मक प्रतिसाद असल्याचं बोललं जातं आहे. काल पत्रकार परिषदेनंतर तसेच आज देखील दिल्लीला जाण्याच्या आधी काही महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती अशी माहिती समोर आली आहे.
आज तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्रीपदाबाबत बैठक
आज दिल्लीत मंत्रीपदाबाबतची बैठक पार पडणार आहे. आज मुख्यमंत्री कोण त्याची बैठक होईल. मुख्यमंत्री म्हणून नाव कोणाचं ते रात्री ठरेल. कोणी कोणताही मंत्रिपद मागितलं नाही, त्या चर्चेला काही अर्थ नाही. सगळे मंत्री आताच होतील की नाही त्याबद्दल काहीच काहीही ठरल नाही, आज बसून आम्ही सगळं ठरवू. आम्ही तर निकाल लागल्यानंतर लगेच सांगितलं की भाजप जो ठरवेल त्याला पाठिंबा देईल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आज रात्री 9 वाजता अमित शाह यांना भेटणार आहेत. महाराष्ट्रातील जबाबदारी कशी पार पाडायची त्यावर चर्चा होईल. मंत्रिमंडळ कसं असेल यावर आज चर्चा होईल. त्या चर्चेतून अंतिम स्वरूप येईल अशी माहिती आज अजित पवारांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना दिली.
एकनाथ शिंदे कदाचित मुख्यमंत्रिपदही स्वीकारणार नाहीत - संजय शिरसाट
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत, याबाबतची माहिती शिंदेंचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय शिरसाट यांनी आज बोलताना दिली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कदाचित उपमुख्यमंत्री बनणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रिपदावर जाणे योग्य नाही. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री करण्यास सांगेल, असंही ते पुढे म्हणाले. एकनाथ शिंदेंना सोडून शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असंही ते पुढे म्हणाले.